आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांना ब्राह्मण्यवाद्यांच्या कैदेतून पानसरे यांनी सोडवले- श्रीमंत कोकाटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नसले, तरी ब्राह्मण्यवाद्यांनी त्यांना गुरूचे स्थान बहाल करून तेच जनतेवर बिंबवले. असाच खोटा इतिहास सर्वसामान्य जनतेवर लादण्यात आला. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ब्राह्मण्यवाद्यांच्या कैदेतून शिवाजी महाराजांची सुटका करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. जनतेच्या या लाडक्या राजामध्ये असलेले सर्व गुण त्यांनी उलगडून दाखवत खरा इतिहास समोर आणला, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
विविध पुरोगामी संघटना व पक्षांच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या "शिवाजी कोण होता?' या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे होते. माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, शिवप्रहारचे संजीव भोर, प्रा. सुभाष कडलग, प्रा. सीताराम काकडे आदी यावेळी उपस्थित होते. कोकाटे म्हणाले, वंशपरंपरेने तलवारबाजी रक्तातच घेऊन आलेल्या शिवरायांना तलवारबाजीचे कसब उपजतच मिळाले होते. असे असतानाही तलवार कधीही न चालवण्याची परंपरा असणाऱ्या दादोजींनी त्यांना तलवार कशी शिकवली असेल? सर्वसामान्यांची दिशाभूल करून ब्राह्मण्यवाद्यांनी अशा बाबी पेरल्या. शिवाजी महाराज आग्य्राच्या कैदेतून सहीसलामत सुटले. मात्र, ब्राह्मण्यवादी विचारसरणीच्या कैदेत त्यांना जखडून ठेवण्यात आले. त्या कैदेतून त्यांची सुटका करण्याचे काम कॉम्रेड पानसरे यांनी केले. शिवरायांचे खरे रूप त्यांनी सर्वसामान्यांसमोर आणत दांभिकपणाचा बुरखा फाडला. कदाचित अशाच कारणांनी त्यांची हत्या झाली असावी.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांची हत्या करणारे गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत. देशात नावाजलेल्या गुप्तचर यंत्रणा असूनही मारेकरी मोकाट आहेत. यंत्रणांना माहिती असणारे गुन्हेगार पकडायचे आहेत की नाही, याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी देणे आवश्यक आहे. या दोन्ही समाजसुधारकांना संपवण्यामागे एकच प्रवृत्ती आहे. मात्र, त्यांचे विचार कोणीही संपवू शकत नाही, असे कोकाटे म्हणाले.