आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक ‘प्लेझर पॅलेस’ फराहबक्ष महालाला गरज डागडुगीची...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -सोळाव्या शतकातील आशिया खंडातील पहिले ऑडिटोरियम असलेल्या फराहबक्ष महालाला तातडीने गरज आहे डागडुजीची. जागतिक पर्यटन दिनाच्या (२७ सप्टेंबर) पार्श्वभूमीवर या महालाच्या जतनासाठी पुरातत्त्व विभागाने सकारात्मक निर्णय घेतला, तरच हा ठेवा जतन होऊ शकेल.
जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी शनिवारी शहर परिसरातील विविध ऐतिहासिक, धार्मिक, तसेच लष्करी पर्यटनस्थळांची पाहणी केली. केंद्राचे मानद संचालक प्रा. एन. बी. मिसाळ, मनपातील प्रसिद्धी अधिकारी आर. एस. खोलम हे त्यांच्यासमवेत होते.

सोलापूर रस्त्यावरील आशियातील एकमेव रणगाडा संग्रहालयाजवळच सोळाव्या शतकात बांधण्यात आलेले आशियातील पहिले मनोरंजन केंद्र आहे. एकेकाळी आमराईने वेढलेल्या उद्यानाच्या मध्यभागी असलेल्या तलावात गुलाबी रंगाचा भव्य कमानी आणि कारंजी असलेला हा देखणा महाल "आनंद देणारी वास्तू' (प्लेझर पॅलेस) म्हणून प्रसिद्ध होता. शहाजहान बादशहाला याच महालावरून ताजमहाल बांधण्याची कल्पना सूचली, असे सांगितले जाते.
पर्शियन आर्किटेक्चरचा उत्तम नमुना असलेल्या निजामशाहीतील या महालाची सध्या मात्र दुरवस्था झाली आहे. पावसाने या महालाचा काही भाग कोसळला आहे. छत धोकादायक झाल्याने वर जाण्याचा जिना बंद करण्यात आला आहे. तातडीने डागडुजी केली, तरच या महालाचे आयुष्य आणखी काही काळ वाढू शकेल.

फराहबख्क्ष महालाव्यतिरिक्त शहराच्या संस्थापकाचे चिरविश्रांतीचे स्थळ असलेला बागरोजा, भुईकोट किल्ला, दमडी मशीद, आलमगीर, सलाबतखान मकबरा (चांदबिबी महाल), डोंगरगण आदी ठिकाणांनाही प्रशिक्षणार्थींनी भेट दिली. आगडगाव येथील श्रीकाळभैरवनाथाचे दर्शन घेऊन तेथील प्रासादिक भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला. या उपक्रमासाठी भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे, चित्रकार योगेश हराळे यांचे सहकार्य लाभले.
बातम्या आणखी आहेत...