आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाची गती आणखी वाढवण्याची आवश्यकता - पालकमंत्री पाचपुते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शेती, औद्योगिकीकरण, पर्यटन, शिक्षण या बाबींना प्राधान्य देऊन विकासाला गती देण्यासाठी आणखी प्रयत्न होण्याची गरज आहे. दुष्काळी उपाययोजना व विकासाच्या कामात लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस मुख्यालयात आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात पाचपुते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक व्ही. के. भोर्डे मंचावर उपस्थित होते. प्रारंभी पोलिस दल, गृहरक्षक दल, अग्निशमन विभाग, रस्ता सुरक्षा पथक, राष्ट्रीय सेवा योजना पथक व श्वानपथकाने शानदार संचलन करून मानवंदना दिली.

पाचपुते म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. उन्हाळ्यात स्थिती आणखी बिकट होणार आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व मागेल त्याला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम पुरवण्यात येणार आहे. या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यात येत आहे. तलावांमध्ये साठलेला गाळ उपसण्याची मोहीम गेल्या वर्षापासून हाती घेण्यात आली असून गाळ काढण्यासाठी बँकांकडून 50 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पाचपुते यांनी सांगितले.

विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या वेळी सादर केलेल्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे, महापौर शीला शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी व शालेय विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी शहर काँग्रेसतर्फे माळीवाडा कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष रईसा शेख, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सेवादलाचे अध्यक्ष केशव मुर्तडक, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सविता साळवे, उज्ज्वला भिंगारदिवे, धनपाल राठोड आदी या वेळी उपस्थित होते.

प्रधान जिल्हा न्यायाधीश ज. द. कुळकर्णी यांच्या हस्ते न्यायालयात ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी वकील संघाचे अध्यक्ष अँड. शिवाजी कराळे, जिल्हा सरकारी वकील अँड. सतीश पाटील, अतिरिक्त सरकारी वकील अँड. सुरेश लगड, वकील संघाचे उपाध्यक्ष अनिल सरोदे, अँड. रमेश जगताप, अँड. सुजाता बोडखे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव आनंद पाटील यांनी केले.

भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्य, समता व बंधूता या तत्त्वांमुळे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून देश ओळखला जातो. ही ओळख कायम टिकवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले. दादा चौधरी विद्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी सुमतीलाल कोठारी, विद्यालयाचे अध्यक्ष अजित बोरा, संजय घुले, रामकृष्ण जोगळेकर, अनंत फडणीस, एल. जी. गायकवाड आदी उपस्थित होते.

नेप्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सरपंच मीरा जपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच नंदू जाधव होते. प्रारंभी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढली. पाकिस्तानी हल्ल्यात मरण पावलेल्या जवानांना ग्रामस्थांनी या वेळी र्शद्धांजली अर्पण केली.