आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्तमधून ३८ हजार टीसीएम पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्याची कृषिप्रधान अर्थव्यवस्था विचारात घेऊन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २७९ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली. यातून सुमारे ३८ हजार टीसीएम (अर्धा टीएमसी) पाणीसाठा विकेंद्रित स्वरूपात निर्माण झाला. या पाण्याचा उपयोग भविष्यात चांगल्या प्रकारे होईल, असा दावा पालकमंत्री राम शिंदे यांनी केला.
६६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील पोलिस मुख्यालय मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यावेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या कामाचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होणार आहेत. २०१६-१७ या वर्षात जलयुक्तच्या कामांसाठी २६४ गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये जनतेच्या सहभागातून जलसंधारण मृदसंधारणांच्या कामांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येणार अाहे.

शिंदे पुढे म्हणाले, महसूल हा प्रशासनाचा कणा आहे. सर्वसामान्य नागरिकांचा या विभागाशी नेहमी संबंध येतो. ऑनलाइन सातबाऱ्याचे काम सर्व तालुक्यांमध्ये सुरू आहे. रेकॉर्ड स्कॅनिंग करण्यात राज्यातील पहिला प्रकल्प जिल्ह्यात पूर्ण होऊ शकला. सेवा हमी कायद्याची अंमलबजावणीही जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न होत असून जिल्ह्यातील ९३ शाळा आयएसओ प्रमाणित झाल्या आहेत. उद्योग उभारण्यात सुलभता यावी, या दृष्टीने सुलभीकरणासाठी समिती तयार करण्यात आली असून याद्वारे जिल्ह्याचे औद्योगिकीकरण व्यवसायवृध्दीमध्ये सुलभता येईल, असा विश्वास आहे. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यात १७ व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणजेच व्हीटीपीमार्फत प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून यातून रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीला चालना मिळेल. छोट्या मध्यम व्यावसायिकांना व्यवसायवृध्दीचा लाभ व्हावा, यासाठी मुद्रा योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे १० हजार लाभार्थींना ८१ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनांना जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ध्वजवंदनानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागामार्फत पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कवडे यांना भारताचे संविधान डॉ. आंबेडकरांची प्रतिमा भेट देण्यात आली. पौर्णिमा अजय शिंदे, गणेश निवृत्ती पवार यांना गुणवंत खेळाडू, तर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून अभिजित आनंदा दळवी, बळीराम किसन सातपुते यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. नेहरू येवा केंद्रामार्फत जय युवा अॅकॅडमीचा २५ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्यसैनिकांसह महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, समाजकल्याण सभापती मीरा चकोर, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त माधव वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, प्रांताधिकारी वामन कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने आदी अधिकारी, मान्यवर व्यक्ती, नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. फिरोदिया हायस्कूलच्या शिक्षिका गीतांजली भावे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हाय अलर्टमुळे चोख बंदोबस्त
जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या हाय अलर्टमुळे ध्वजवंदनाच्या प्रमुख कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात अाला होता. मैदानाच्या चारही बाजूला सशस्त्र जवान तैनात होते. प्रमुख सोहळ्याचे फोटो व्हिडीओ घेण्यासाठी छोटे बॅरिकेडस् लावून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पत्रकारांव्यतिरिक्त इतरांना तेथे प्रवेश देण्यात आला नाही.

टंचाई निवारणासाठी उपाययोजना
टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात येत असून १०५ गावे, ५५५ वाड्या-वस्त्यांना १४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री शिंदे यांनी दिली. मात्र, चारा डेपो अथवा चारा छावण्यांबाबत कोणतेही धोरण यावेळी जाहीर करण्यात आले नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कवडे, तर सावेडी येथील जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या कार्यक्रमास तहसीलदार सुधीर पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी विजय कोते, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता कार्यालयाचे सहायक संचालक ब्रिजेश निमगावकर, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक चंद्रकांत तांबे, लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लष्कराचे बँडपथक ठरले लक्षवेधक
पोलिस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शानदार संचलन करत मानवंदना दिली. संचलनानंतर लष्कराच्या दोन बँडपथकांनी स्वतंत्रपणे केलेले वादन उपस्थितांसाठी पर्वणी ठरली. बॅगपायपरवर देशभक्तिपर गीते त्याच्या साथीला ढोल ताशांचा निनाद लक्षवेधक ठरले. लष्कराच्या बँडपथकाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.