आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसाठी पुरेसे पाणी राखून ठेवा, आमदार जगताप यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुळा धरणातील घटत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर नगर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक साठा धरणात राखावा, अशी मागणी करणारे पत्र आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिले. पाणीउपशावर परिणाम होऊन शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही, याची खबरदारी घेण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे.

जगताप यांनी पत्रात म्हटले, २० जुलैला धरणात ५८४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. मृतसाठा वगळता धरणात १३४७ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या पंपांचा आराखडा धरणातील मृतसाठ्याची पातळी लक्षात घेऊन करण्यात आली आहे. धरणातून पाण्याचा उपसा करणारे मुळानगर पम्पिंग स्टेशन येथील ५६० अश्वशक्तीच्या पंपांचे हेड १७५२ फूट पातळीपर्यंत बसवण्यात आले आहेत. पाणीपातळी १७५२ फुटांच्या खाली गेल्यास पंपांची पाणी खेचण्याची शक्ती कमी होऊन पुरवठ्यावर परिणाम होतो.

पावसाळा सुरू होऊन दीड महिना होत आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने अपेक्षेप्रमाणे नवीन पाण्याची आवक अजून झालेली नाही. पावसाच्या परिस्थितीत फरक पडल्यास धरणाची पातळी नीचांकी होण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या उपसाक्षमतेवर परिणाम होऊन नगरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपसा प्रक्रियेवर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने धरणातील साठा योग्य राखण्याची मागणी जगताप यांनी पत्रात केली आहे. संबंधित विभागांना तशा सूचना देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मुळा धरणातील साठ्यात वाढ
पाणलोटक्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे मुळा धरणातील पाण्याची आवक वाढली असून सध्या धरणात ६१४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गेल्या २४ तासांत धरणात २०० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. पाणलोट क्षेत्र असलेल्या कोतूळ परिसरातून हजार क्युसेक्स आवक सुरू अाहे. पावसाचा जोर कायम राह्यल्यास मुळा धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होऊ शकेल.
बातम्या आणखी आहेत...