आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reserved Space For The Idgah Said Chief Minister

शहर विकास आराखड्यात ईदगाहसाठी राखीव जागा ठेवू- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आश्वासन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मुस्लिम समाजासाठी आर्थिक नियोजनात भरीव तरतूद करण्यात येईल, तसेच शहर विकास आराखड्यात कब्रस्तान व ईदगाहसाठी जागा राखीव ठेवण्याबाबतचे परिपत्रक तातडीने काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले, अशी माहिती मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस संघटनेचे प्रदेश संघटक हसिफ नदाफ यांनी दिली.

संघटनेच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शौकत तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेऊन मुस्लिम समाजाच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अल्पसंख्याक मंत्री आरिफ नसिम खान, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार हसन कमाल, सरचिटणीस इम्तियाज शेख आदी उपस्थित होते.

मुस्लिम समाजासाठी 15 कलमी कार्यक्रमाची कृतिशील अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात येईल. मुस्लिम बहुल क्षेत्रात अल्पसंख्याक अंगणवाड्या सुरू करून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करू, असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिल्याचे नदाफ यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक नियोजनात अल्पसंख्याकासाठी 15 टक्के हिस्सा राखीव करा, आंध्रप्रदेशच्या धर्तीवर मुस्लिम ओबीसीची वेगळी यादी तयार करून त्यांना सब कोटा जाहीर करा, गरीब मुस्लिम विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करा, जिल्हा पातळीवर आश्रमशाळा व वसतिगृहाची व्यवस्था करा, जात सदृश आडनावे असणार्‍या जमातींना व्यवसाय पुरावे न मागता दाखले द्या, हज यात्रेकरूंसाठीचा कर रद्द करा, विविध महामंडळ समित्यांवर मुस्लिम समाजाचा किमान एक प्रतिनिधी नियुक्त करा, मुस्लिम गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन उपलब्ध करून स्वस्त दराने कर्जपुरवठा करा, मौलाना आझाद महामंडळास पाचशे कोटींचा निधी द्या, सच्चर समितीच्या शिफारशींची पूर्ण अंमलबजावणी करा आदी मागण्या संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या असल्याचे नदाफ यांनी सांगितले.