आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेला. थाळीनाद करत सरकारच्या धोरणांचा निषेध करत महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाजप सरकारच्या कारभारावरही टीका करण्यात आली.

एप्रिल २०१४ पासून थकलेले मानधन फरक देण्यात यावा, २०१४ मधील भाऊबीज भेट मिळावी, जनश्री विम्याचा लाभ द्यावा, योजनेच्या कामासाठी लागणारे रजिस्टर मासिक अहवाल प्रकल्प कार्यालयाने द्यावेत, कर्जत प्रकल्पातील नवीन अंगणवाडी सेविकांना नोव्हेंबरपासून राज्याचे मानधन नाही, योजनाबाह्य कामांची सक्ती करू नये, रिक्त जागा भराव्यात यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. शेकडो महिलांनी शिवाजी महाराज पुतळ्यापासून हातात थाळी घेऊन सरकारचा निषेध केला.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आघाडी सरकारच्या काळातही आंदोलने सुरूच होती. ती परंपरा सरकार बदलल्यानंतरही सुरूच आहे. भाजप सरकारकडून अपेक्षाभंग झाल्याची टीका मोर्चातील संतप्त महिलांनी केली.

अंगणवाडीत काम करणाऱ्या बहुतांश महिला कर्मचारी गरीब कुटूंतील आहेत. पगार थकल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांच्या या गंभीर प्रश्नांची दखल शासनाने घेऊन प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. सरकारकडे २०३ कोटींचे साहित्य खरेदी करायला, तसेच चिक्की खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, पण आम्हाला हक्काचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. भाजपचे सरकार आल्यानंतर "अच्छे दिन' येतील असे वाटले होते, पण "बुरे दिन' आले, अशी खंत संघटनेच्या कार्याध्यक्ष मंगला सराफ यांनी व्यक्त केली.
मोर्चात सहभागी कर्मचाऱ्यांनी सरकारसह जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत थाळीनाद केला. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मागण्या तातडीने मान्य कराव्यात, असा आग्रह आंदोलकांनी धरला होता. नंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांची भेट घेतली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संतप्त भावना ससे यांच्यासमोर मांडल्या. त्यावर ससे यांनी जे प्रश्न स्थानिक स्तरावरील आहेत, ते सोडवले जातील, पण जे राज्यस्तरावरील आहेत, ते वरिष्ठ पातळीवर कळवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या कार्याध्यक्ष मंगला सराफ, प्रदेश उपाध्यक्ष प्रभावती सत्रे, जिल्हा कार्याध्यक्ष मंगला साळवे, आशा पिंपळे, आशा मगर, मंगल ढगे, शामला साखरे, शांता गोरे, उषा घुगरे, सुनीता कुलकर्णी आदी महिला पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होत्या.

'बुरे दिन' आले...
सरकारनेआम्हाला "बुरे दिन' दाखवले आहेत. खासदार आमदारांच्या वेतनात वाढ करणाऱ्या सरकारला भाऊबीजेसाठी द्यायला पैसे नाहीत. २०३ कोटींचे साहित्य चिक्की खरेदीसाठी मात्र पैसे आहेत. आमच्या खात्याच्या मंत्र्यांना राज्यात काय चालले हेच माहिती नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेच्या कार्याध्यक्ष मंगला सराफ यांनी यावेळी बोलताना केली.

आहार बंद, शेतात करणार मजुरी
सरकारच्याकारभाराच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारपासून (२२ जुलै) आहार वाटप बंद करणार आहेत. मानधन थकवल्याने आता उदरनिर्वाहासाठी महिला शेतात मजुरीसाठी जाणार असल्याची घोषणाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

मानधनातही कपात
जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाडी सेविका गरीब असून काही महिला विधवा आहेत. त्यांचा प्रपंच याच कामावर चालतो. सरकारने मानधन दिले नाही. जर असे होत असेल, तर आम्ही काय खाणार? काँग्रेसच्या काळात वेळेत पगार होत होते, पण भाजपच्या काळात भाऊबीजही मिळाली नाही. तसेच मानधनातही कपात केली. प्रभावतीसत्रे, जिल्हाध्यक्ष,अंगणवाडी संघटना.
बातम्या आणखी आहेत...