आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता मोहीम यशस्वीपणे न राबवल्यास दखल घेऊ- खासदार दिलीप गांधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे जनता आता आपले थेट मांडू शकते, पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद दिला, तर स्वच्छ भारत संकल्पना पूर्णत्वाला जाईल. स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवले गेले नाही, तर त्याची निश्चित दखल घेण्यात येईल, असा इशारा खासदार दिलीप गांधी यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत गांधी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा गुंड, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवल, अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव आदी उपस्थित होते. गांधी म्हणाले, जिल्ह्यात सर्वत्र अस्वच्छता आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरापासून स्वच्छता अभियानात सहभागी झाले पाहिजे. गाव स्वच्छ राहिला, तर तालुका स्वच्छ होईल, त्‍यासाठी सर्वांनी एकत्र येऊन केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानात सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन गांधी यांनी केले. नगर शहरात स्वच्छतेसाठी समित्या स्थापन केल्या आहेत. कचरा कोठे टाकायचा, याबाबत निर्णय घ्यायचा आहे. आठवडे बाजारात स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. पाथर्डी शहरात महत्त्वाचा रस्ताच बंद झाला आहे, तेथे काय मोगलाई आहे का, अशा शब्दांत गांधी संबंधित अधिका-यांवर सुनावले. जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, प्रत्येक कार्यालयात स्वच्छता राखली गेली पाहिजे, त्यासाठी सवय महत्त्वाची आहे. आठवड्यातील बुधवार हा कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी द्या, कोणीही रस्त्यावर कचरा टाकू नका, नवीन शौचालयांसाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत. पंधरा दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होणार असल्याचे कवडे यांनी सांगितले. खासदार लोखंडे म्हणाले, शिर्डी मतदारसंघात गटारींचा प्रश्न गंभीर आहे. सुलभ शौचालयाच्या ठिकाणी पाणी नाही, त्या ठिकाणी केंद्राच्या योजनेतून कूपनलिका देता येईल का, याबाबत विचार झाला पाहिजे. प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणा, अशी मागणी देखील लोखंडे यांनी केली.
पिण्याच्या पाण्याची दक्षता घ्या
जिल्हाभरात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नमुने तपासले का, असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला. डेंग्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाशी संलग्न यंत्रणा उभी करून पिण्याचे पाणी स्वच्छ कसे देता येईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना गांधी यांनी दिल्या.