आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Retried Judge Chandrashekhar Dharmadhikari At Ahmednagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता मला काळजी आहे तुमच्या-माझ्या नातीची..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: आपण एकमेकांच्या ‘शेजारी’ राहतो, पण ‘सोबत’ राहत नाही. परस्परातील संवाद गोठत चालला आहे. त्यामुळे ‘समाज’ संपून ‘माज’ तेवढा उरला आहे. अशावेळी पुढच्या पिढय़ांसाठी आपण काय शिल्लक ठेवणार आहोत या चिंतेने मन भयव्याकूळ होते. मला माझी किंवा मुलांची काळजी नाही. चिंता वाटते ती माझ्या-तुमच्या नातीची. त्यांना मी चिमणी दाखवू शकत नाही की काऊ-चिऊच्या गोष्टी सांगू शकत नाही, अशी खंत निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
मुंबई येथील युआरएल फाउंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या विविध पुरस्कारांचे वितरण यशवंत नाट्य मंदिरात नुकतेच झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून धर्माधिकारी बोलत होते. सामाजिक गौरव पुरस्कार स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांना या वेळी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, र्शीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी भीष्मराज बाम, कवी मंगेश पाडगावकर, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, संगीतकार रवी दाते यांच्यासह फाउंडेशनचे संस्थापक उदयदादा लाड, कवी रामदास फुटाणे, साहित्यिक शंकर वैद्य, फ. मुं. शिंदे, अशोक नायगावकर, राजदत्त, चित्रकार अच्युत पालव आदी उपस्थित होते. इतर पुरस्कारार्थींमध्ये अविनाश धर्माधिकारी, सुरेश खोपडे, राहुल देशमुख, गंगाराम गवाणकर, ललिता बांठिया, डॉ. ज्ञानेश पाटील, उषा संघानी, आनंद गोखले, यशवंत साटम, कृष्णकांत पारकर आदींचा समावेश होता.
चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील बिघडत्या सामाजिक आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करून नवीन समाजनिर्मितीसाठी आकांक्षा निर्माण करणार्‍यांचा हा कृतज्ञता सन्मान असल्याचे नमूद केले.
भीष्मराज बाम म्हणाले, जेव्हा कठीण परिस्थिती येते, तेव्हा देव तुमची परीक्षा घेत असतो. संकटे येऊच देऊ नको, असे देवाला सांगण्याऐवजी अशी संकटे येऊ दे ज्याला तोंड देण्याचे सार्मथ्य माझ्या अंगी येईल, अशी प्रार्थना आपण करायला हवी. चांगले काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार सुरू केल्याचे उदयदादा लाड यांनी प्रास्ताविकात सांगितले. सामाजिक गौरव पुरस्कार मिळालेल्या डॉ. कुलकर्णी यांच्यासह अविनाश धर्माधिकारी, खोपडे व देशमुख यांच्याशी स्मिता गवाणकर यांनी संवाद साधत त्यांचे कार्य उलगडून दाखवले. स्नेहालयमुळे लालबत्ती भागातील आमच्या भगिनी आता सक्षम झाल्या असून इतरांवर संकट येते तेव्हा मदतीचा पहिला हात आता त्या पुढे करतात, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. कुठल्याही दबावाला बळी न पडता संघर्ष केल्यामुळे वासनाकांडातील 22 आरोपींना जन्मठेप होऊ शकली. स्नेहालय गेल्या 23 वर्षांपासून करीत असलेल्या कामामुळे आज एकही अल्पवयीन मुलगी नगर जिल्ह्यातील लालबत्ती भागात धंदा करताना दिसत नाही, असे ते म्हणाले.