आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revenue Department Office Arm Permission Granted Nagar

महसूल अधिकारी होणार हत्यारबंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - वाळूमाफियांकडून महसूल अधिका-यांना धमकावण्याच्या घटना प्रशासनाने गांभीर्याने घेतल्या आहेत. तहसीलदारांसह फिरत्या पथकातील महसूल अधिका-यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली.
महसूल अधिका-यांच्या असुरक्षिततेवर शनिवारी ‘दिव्य मराठी’ने प्रकाश टाकला होता.अलीकडच्या काही वर्षांत वाळू व इतर गौण खनिजांचे उत्खनन करणा-यांकडून अधिका-यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथे एका वाळू ठेकेदाराकडून आरटीओला धमकावण्याचा प्रकार घडला. त्यापाठोपाठ 13 जानेवारीला घोड नदीपात्रातून वाळू उत्खनन करणारा जेसीबी पकडण्यासाठी गेलेले श्रीगोंद्याचे तहसीलदार अनिल दौंडे यांना शिवीगाळ झाल्याचे समजले. मात्र, तसे घडले नसल्याचा निर्वाळा दौंडे यांनी दिला. या घटनांच्या पार्श्वभूमीवर लवकरच तहसीलदारांना शस्त्र परवाना देण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. अधिका-यांना शस्त्र परवाना देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना शस्त्र परवाना दिला जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव म्हणाले.
शस्त्र परवाना दिला, तरच संरक्षण शक्य - अपुरे मनुष्यबळ व कोणतेही शस्त्र जवळ नसताना कर्तव्य बजवावे लागते. त्यावेळी आपण किती हतबल आहोत याची प्रचिती येते. शासनाने शस्त्र परवाना दिला, तरच स्वसंरक्षण करता येईल. - अनिल दौंडे, तहसीलदार, श्रीगोंदा.
स्वागतार्ह निर्णय - कारवाईसाठी निघालेल्या तहसीलदाराकडे पोलिस संरक्षण मागण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे तहसीलदाराला शस्त्र मिळणे आवश्यक आहे. शस्त्र देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. - ए. एस. रंगानायक, प्रांताधिकारी.