आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचार्‍यांचे आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारपासून आंदोलनाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय व भूसंपादन कार्यालयासमोर दुपारी निदर्शने करण्यात आली. गुरुवारपासून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार आहे.

अव्वल कारकून व मंडल अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदारपदी पदोन्नतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत 6 जून 2013 रोजी शासननिर्णय काढण्यात आला. यात अमरावती, नागपूर व नाशिक विभागातील कर्मचार्‍यांवर अन्याय होत असून या शासननिर्णयास स्थगिती देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. महसूल कर्मचार्‍यांना विनामूल्य कुटुंब आरोग्य योजना लागू करावी, वर्ग तीन व चारच्या कर्मचार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबत ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या कर्मचार्‍यांचे नियम लागू करावेत, वर्ग तीन व चारची रिक्त पदे तातडीने भरावीत, लिपिक/टंकलेखन पदाचे नामकरण ‘महसूल सहायक’ करावे यांसह विविध मागण्या प्रलंबित आहेत.

दुपारच्या सुटीत कर्मचार्‍यांनी निदर्शने केली. गुरुवारी सकाळच्या सत्रात अर्धा दिवस धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 26 ते 30 जुलैपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येईल. 31 जुलै रोजी एक दिवस लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास 16 ऑगस्टपासून बेमुदत संप करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.