आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगमनेर - ‘‘टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुरू केलेल्या योजना समजावून घ्या. या योजना जनतेला मोठा दिलासा देऊ शकतात. अडचणीच्या काळात डीपीडीसीकडून पैसे कसे आणायचे हे तुम्हाला समजत नाही का?’’ असा सवाल करीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकार्यांची झाडाझडती घेत या योजनांची कामे सुरू करण्याचे आदेश दिले.
संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी दुपारी महसूलमंत्री थोरात यांनी टंचाई आढावा बैठक घेतली. आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, सभापती सुरेखा मोरे, उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी या वेळी उपस्थित होते. गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे यांनी तालुक्यातील टंचाई परिस्थितीची माहिती दिली. सदस्यांच्या प्रo्नानंतर मंत्री थोरात यांनी अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली. टंचाईच्या काळात सुरू असलेले पाण्याचे टँकर अपुरे पडत असल्याची बाब काही पदाधिकार्यांनी महसूलमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
थोरात यांनी तातडीने टँकर वाढवण्याचे आदेश प्रशासनाला देत पाणी कोठेही कमी पडणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. वीजबिल न भरल्याने पठार भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याची तक्रार एका कार्यकर्त्याने केली. त्यावर गटविकास अधिकार्यांनी बिलाची रक्कम भरल्याशिवाय वीजजोड पूर्ववत करता येणार नसल्याचे महावितरण सांगत असल्याचे महसूलमंत्र्यांना सांगितले. यावर त्यांनी टंचाईकाळात बिलाअभावी वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नयेत, असे आदेश शासनाने दिल्याचे स्पष्ट केले. स्वयंसेवी संस्थांकडून 250 व जिल्हा परिषदेकडून 77 पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून त्या गावोगाव दिल्या आहेत. तथापि, आणखी टाक्यांची गरज असल्याचे गटविकास अधिकारी बेडसे यांनी सांगितले. माजी पंचायत समिती सदस्य सुरेश थोरात यांनी संस्थेच्या टँकरची बिले वेळेवर मिळत नसल्याची तक्रार केली. संस्थेकडून वेळेवर बिले येत नसल्याने अडचण येत असल्याचे बेडसे यांनी स्पष्ट केले.
पाण्याचे नियोजन करा
टंचाई स्थिती गंभीर होत असल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करा. काटकसरीने पाण्याचा वापर करा. पाणी संपले की, लोक ओरडतील याची वाट पाहू नका. पाण्याचे स्त्रोत शोधून ठेवा, असे आदेश मंत्री थोरात यांनी बैठकीत दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.