आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरोगामी विचारधारा बळकट करा : महसूलमंत्री थोरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पुरोगामी विचारधारा बळकट करण्याचे काम कास्ट्राइब कल्याण महासंघाने करावे. पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन पुरोगामी विचार वाढवले पाहिजेत, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी केले.

टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथे आयोजित महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कास्ट्राइब कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष गुणवंत खुरंगळे, राज्य उपाध्यक्ष हर्षवर्धन सोनवणे, प्राचार्य म. न. कांबळे, मुख्य संघटक राजेंद्र कांबळे, महासचिव विलास बोर्डे, अतिरिक्त महासचिव कमलाकर म्हस्के, लातूर विभागीय अध्यक्ष श्रीराम आघाव, औरंगाबाद विभागीय अध्यक्ष डॉ. हरिचंद्र रामटेके, शेषराव हरके आदी या वेळी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, नेते धोरण ठरवतात, अंमलबजावणी मात्र प्रशासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी करतात. त्यावरच सरकारचे यश ठरते. कास्ट्राइब कल्याण महासंघ ही पुरोगामी विचारांची संघटना आहे. सरकारचे विचारही पुरोगामी असतात. त्यामुळे मी या अधिवेशनाला उपस्थित राहिलो.

महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांनी समाजाला पुरोगामी विचारांची शिकवण दिली. त्याचीच कास सरकार धरत आहे. शासन आणि संघटना यांचे घनिष्ट नाते आहे. ही भावना अधिक दृढ होण्यासाठी संघटनेत विभाजित नेतृत्व नसावे. संघटनेच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

डॉ. तांबे म्हणाले, न्याय्य हक्कांसाठी लढणारी व पुरोगामी विचार घेऊन पुढे जाणारी ही संघटना आहे. शोषित समाजव्यवस्था दूर करण्याचे काम होणे गरजेचे आहे. देशात नेहमीच क्रांती व प्रतिक्रांतीचे चक्र सुरू असते.

अरूण गाडे म्हणाले, संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाने विचार करणे गरजेचे आहे. प्रास्ताविक विलास बोर्डे यांनी, तर सूत्रसंचालन सिध्दार्थ टाक यांनी केले.