आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल दिनीच जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संपावर; शासकीय कामकाज ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महसूल दिनीच जिल्ह्यातील महसूल कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून संप सुरू केला. या संपात 750 कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपामुळे शासकीय कामकाज दिवसभर ठप्प झाले होते. नायब तहसीलदारपदाचा ग्रेड-पे वाढवून द्यावा, महसूल विभागातील लिपिकाचे पदनाम बदलून त्याला महसूल सहायक असे पदनाम द्यावे, महसूल कर्मचा-यांच्या अपत्याला खात्यात नोकरी द्यावी, कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा देण्यात यावा, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती द्यावी, अनुकंपा तत्त्वावरील सेवाभरतीची पाच टक्के अट रद्द करावी, महसूल विभागातील हवालदार, नाईक, दप्तरी पदाचे मूळ वेतन लिपिकाप्रमाणे द्यावे, महसूल अधिकारी व कर्मचा-यांवर होणारे हल्ले रोखावेत, किरकोळ तक्रारीवरून परस्पर दाखल होणारे फौजदारी गुन्हे रोखावेत, शासनाच्या नवीन योजनांसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, सरचिटणीस ज्ञानेश्वर कांबळे व कोषाध्यक्ष कैलास साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू करण्यात आला आहे.
संपात महसूल विभागातील कर्मचारी व पदोन्नती नायब तहसीलदारांसह वर्ग-3 व वर्ग-4 चे कर्मचारी सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन त्यांनी मागण्यांबाबत घोषणाबाजी केली. 750 महसूल कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांतील व जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. शासकीय कामासाठी ग्रामीण भागातून येणा-या नागरिकांना या संपाचा नाहक त्रास सहन करावा लागला.

या संपाला राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पाठिंबा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष योगिराज खोंडे म्हणाले, महसूल कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून सातत्याने आंदोलने करण्यात आली. राज्य शासन जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
काळ्या फिती लावण्यावरून वाद
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी नियोजन भवनात शुक्रवारी दुपारी महसूल कर्मचारी व अधिका-यांचा जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते सत्कार आयोजित करण्यात आला होता. संघटनेचे सरचिटणीस ज्ञानेश्वर कांबळे यांनी या कार्यक्रमाला कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर लगेचच अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी काम करणा-या कर्मचा-यांचा हा सत्कार आहे. संप असला, तरी सत्काराला गेले पाहिजे, असे सांगून कर्मचारी काळ्या फिती लावून कार्यक्रमाला जातील, असे स्पष्ट केले.

पत्रकातून दिलगिरी
राज्य शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आम्हाला नाईलाजाने संपाचे हत्यार उपसावे लागले. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या होणा-या गैरसोईबाबत आम्ही दिलगीर आहोत, असे कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

संपावर ठाम राहणार
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या सूचनेनुसार संप सुरू करण्यात आला आहे. शासनाशी अनेकदा मागण्यांबाबत चर्चा झाली. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नाही. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत संपावर आम्ही ठाम आहोत.’’ भाऊसाहेब डमाळे, अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना.