आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतपदानिमित्त मदर तेरेसांच्या नगर भेटीला मिळणार उजाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - रोममधील व्हॅटिकन सिटी येथे रविवारी मदर तेेरेसा यांना संत पद बहाल करण्यात येणार आहे. त्या प्रित्यर्थ नगरमधील सर्वात जुन्या संत जॉन चर्च येथे रविवारी सामुदायिक प्रार्थनेच्या वेळी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मदर तेेरेसा यांनी पाच सप्टेंबर १९८६ रोजी नगरला भेेट दिली होती. त्यावेळी भिंगारमधील संत जॉन चर्चला भेट देऊन प्रार्थना केली होती. त्यांच्या नगर भेटीच्या आठवणींना यामुळे उजाळा मिळणार आहे, अशी माहिती फादर मायकेल बनसोडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

मदर तेेरेसा कॅथॉलिक पंथाच्या होत्या. संत जॉन चर्च नगरमधील कॅथॉलिक पंथाचे सर्वांत जुने प्रार्थना स्थळ आहे. त्यामुळे त्यांनी नगरला आल्यावर आवर्जून या चर्चमध्ये येऊन प्रार्थना केली होती. त्यांच्या नगर भेटीत त्यांनी त्यावेळी लष्कराला भेट दिली होती. नगर महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांचे १५ मिनिटे भाषणही झाले होते. त्यानंतर त्या या चर्चमध्ये आल्या. मदर तेरेसा यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी पोप जॉन पॉल दुसरे यांनी त्यांना धन्यवादित म्हणून घोषित केले. त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी त्यांना रोम येथे रविवारी मरणोत्तर संतपद बहाल केले जाणार आहे. रोम येथील सध्याचे परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस हे त्यांना हे पद बहाल करतील. नगरमधील संत जॉन चर्चची स्थापना १८५१ मध्ये झाली. मदर तेेरेसा यांनी या चर्चला दिलेल्या भेटीमुळे त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असल्याचे फादर बनसोडे यांनी सांगितले. त्यांच्या नगर भेटीच्या वेळी १९८६ मध्ये येथे विल्यम फलकाव हे धर्मगुरु होते. या भेटीच्या वेळी मदर तेेरेसा यांनी चर्चच्या इतिवृत्तात एक संदेश लिहिला होता. त्यामधून त्यांनी प्रेमाचीच शिकवण दिली असल्याचे फादर बनसोडे यांनी सांगितले.
तेरेसांचा साधेपणा
मदर तेरेसांच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये वेगळ्या जागेची व्यवस्था करण्यात अाली होती. परंतु, त्यांनी त्या स्थानावर जाता सर्वसामान्यांत फरशीवर गुडघ्यावर बसून प्रार्थना केली. देवाच्या दारात कोणी श्रेष्ठ नाही. सर्व सारखेच आहेत, असा संदेश त्यांनी या कृतीतून दिला. त्यांच्या साधेपणा उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. ज्यो पाटोळे, मदरच्या नगर भेटीचे साक्षीदार.
बातम्या आणखी आहेत...