आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुहेरी हत्याकांडाचे धागेदोरे पोलिसांना मिळेनात...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विनायकनगर परिसरातील समता कॉलनीतील रोडे दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी कोणतेही धागेदोरे मिळालेले नव्हते. प्रथमदर्शनी हा चोरीचा बनाव वाटत असला, तरी पोलिस सर्व शक्यता पडताळून पहात आहेत. आतापर्यंत ३ संशयितांकडे कसून चौकशी करण्यात आली असली, तरी कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.

टणक हत्याराने डोक्यात तीक्ष्ण वार करून प्रकाश गुलाब रोडे (वय ५०) व मीनाक्षी प्रकाश रोडे (वय ४५) या दाम्पत्याच्या खून करण्यात आला. श्रीगोंदे तालुक्यातील सुरेगाव या मूळ गावी गुरुवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकाश रोडे (वय ५५) एल अँड टी कंपनीत सुरक्षा अधिकारी होते. त्यांचा मुलगा स्वप्नील मर्चंट नेव्हीत नोकरीला, तर मुलगी कोमल ही पुण्यात शिक्षण घेत आहे. प्रकाश यांचा एक भाऊ मुंबईत खासगी कंपनीत नोकरीला आहे.

या गुन्ह्याच्या तपासाकरिता ४ पथके नेमलेली आहेत. मारेकऱ्यांनी घराच्या मागील बाजूने आत प्रवेश केला. पहाटेच्या सुमारास हत्याकांड घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घरातील सामानाची उचकापाचक झालेली होती. मीनाक्षी रोडे यांचा मृतदेह बाहेरच्या आवारातील बाथरुममध्ये, तर प्रकाश रोडे यांचा मृतदेह शयनकक्षात पलंगावरच झोपलेल्या अवस्थेतच आढळला. पाठीमागच्या आवारात लावलेली दुचाकी चोरीला गेल्याचा उल्लेख फिर्यादीत होता. मात्र, ही दुचाकी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
रोडे यांच्या घरामागे शेत आहे. मारेकरी त्या मार्गे पळून गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. एल अँड टी कंपनीच्या गोदामात झालेल्या कॉपर चोरीच्या प्रकरणात प्रकाश रोडे फिर्यादी होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मुकुंदनगरमधील दोघा कामगारांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला होता. त्यांचा रोडे दाम्पत्याच्या खून प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का, यादृष्टीनेही पोलिसांनी तपास केला. या कामगारांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यातूनही कोणताच निष्कर्ष निघू शकला नाही, असे पोलिसांनी सांगितले.