आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेकीमुळे कोठल्यात तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील एका कत्तलखान्यातील जनावरांची सुटका करण्याच्या वादातून दोन गटांत रविवारी दुपारी तणाव निर्माण झाला. परस्परविरोधी घोषणाबाजी दगडफेक झाल्यामुळे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. एका गटाने केलेली दगडफेक मारहाणीत राज्य गुप्तवार्ता विभागाचे तीन पोलिस अधिकारी कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

कोठला परिसरातील एका कत्तलखान्यात जनावरांची कत्तल होत असल्याची तक्रार एका गटाने तोफखाना पोलिस ठाण्यात केली. सकाळी अकराच्या सुमारास पोलिस निरीक्षक लक्ष्मण काळे, उपनिरीक्षक चिटमपल्ले फौजफाट्यासह घटनास्थळी गेले. त्यांच्याबरोबर असलेल्या युवकांच्या एका गटाने कत्तलखान्यातून जनावरांची सुटका केली. सुटका केेलेली जनावरे एका ट्रकमधून बाहेर नेत असताना परिसरातील दुसऱ्या गटाने घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे जनावरांची सुटका करायला गेलेल्या गटानेही घोषणाबाजी केली.

दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरु झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. तोपर्यंत शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक यादवराव पाटील यांनीही सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत दंगल नियंत्रक पोलिस पथकाला पाचारण करण्यात आले.
दरम्यान, दोन्ही गट आमने-सामने येऊन दगडफेक सुरू झाली. त्यामुळे तणाव आणखी वाढला. दगडफेकीत जनावरांची सुटका करण्यासाठी आणलेल्या ट्रकचा चालक जखमी झाला. पोलिसांनी किरकोळ लाठीमार करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. दिवसभर कोठला परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
राज्य गुप्तवार्ता विभागाचे तीन पोलिस जखमी
राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलिस अधिकारी संतोष शामराव धनलगडे, अनिल रभाजी औटी कॉन्स्टेबल कृष्णा बबन विधाते या घटनेची माहिती घेण्यासाठी गेले होते. एका गटाने केलेल्या हल्ल्यात हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. नंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.