आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकर-ट्रक अपघाताने अग्नितांडव;सटाणा महामार्गावर चार दुचाकी खाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - विमानाचे इंधन घेऊन जाणारा टॅँकर व लोखंडी सळयांची वाहतूक करणार्‍या कंटेनरची भीषण धडक होऊन विंचूर-प्रकाशा महामार्गावर अक्षरश: आगीचे लोळ निर्माण झाले होते. रविवारी दुपारी झालेल्या या अग्नितांडवात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चार दुचाकी मात्र खाक झाल्या. परिसरातील अर्धा एकर कांदा, एक ट्रक चारा, व तीन ट्रक खतही जळून नष्ट झाले. दुर्घटनेमुळे महामार्गावरील सुमारे सहा तास ठप्प झाली होती.

साबरमतीहून (गुजरात) पुणे विमानतळावर एटीएफ (एअर टर्बोजेट फ्यूएल) इंधन घेऊन जाणारा टँकर (जीजे 18-टी-1287) रविवारी दुपारी दीड वाजता वीरगावनजीक लकड्या पुलाच्या वळणावर सटाण्याकडून गुजरातच्या दिशेने जाणारा कंटेनर (आरजे 01 जीए 2367) व टँकर यांच्यात धडक झाली. यात इंधनाच्या टँकरने पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने दूरवर लोळ दिसून येत होते. या अग्नितांडवामुळे रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीस्वारांनी आपल्या गाड्या सोडून पळ काढला. सुदैवाने ते बचावले, मात्र दुचाकी जळून खाक झाल्या. जैतापूर येथील दुचाकीस्वार विठ्ठल कृष्णा चौधरी हे भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, टँकरच्या मागून कारने प्रवास करणारे नाशिक येथील डॉ. संदीप भामरे यांनी समयसूचकता दाखवून बाजूच्या शेतात कार घुसवली, त्यामुळे ते बचावले.

अर्धा एकर कांदा नष्ट
आगीच्या तांडवात रस्त्यालगतच्या सिंधूबाई गांगुर्डे यांचा अर्धा एकर कांदा, तर नानाजी गांगुर्डे यांचा एक ट्रक चारा, तीन ट्रक शेणखत जळून खाक झाल्याने अगोदरच गारपिटीने त्रस्त असलेल्या दोन्ही शेतकर्‍यांवर आगीने घाला घातला.

यंत्रणा कुचकामी
आगीची माहिती कळवूनही अग्निशमन यंत्रणा दीड तासांनी घटनास्थळी पोहोचल्याने अग्निशमन वाहनाचा काहीच उपयोग झाला नाही. आगीने सर्वच वाहने भस्मसात झाल्यानंतर अग्निशमन दल पोहोचण्याची परंपरा या वेळीही कायम राहिली.