आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोपानंतरही रस्ते अडलेलेच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गणरायाला निरोप देऊन दोन दिवस उलटले, तरी शहरातील बहुतेक सर्व रस्ते गणेश मंडळांनी अडवून ठेवले आहेत. विसर्जनानंतर तातडीने मंडप काढून घेण्याबाबत मंडळे उदासीन आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे आहे. दरम्यान, मंडप तातडीने काढून घेण्याबाबतच्या सूचना महापालिकेने शुक्रवारी सर्व मंडळांना दिल्या.

गणेशोत्सवाच्या आधी आठ-पंधरा दिवस विविध मंडळांनीरस्त्यांवर भव्य मंडप उभारले होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. आता गणेशोत्सव संपला, तरी मंडळांकडून मंडप काढण्याकडे दुर्लक्ष होत आहे. विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशीच मंडप काढून घेणे आवश्यक होते. मात्र, विसर्जनानंतर कार्यकर्ते मंडपाकडे फिरकलेच नाहीत.

मंडप उभारण्यासाठी महापालिका व पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असते. सुमारे साडेतीनशे मंडळांनी पोलिसांकडून परवानगी घेतली होती. मनपाकडून मात्र अवघ्या 30 मंडळांनीच परवानगी घेतली होती. अनेक मंडळांनी भर रस्त्यात बेकायदेशीरपणे मंडप उभारले होते. गणेशोत्सवामुळे मनपा प्रशासन व पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. उत्सव संपला, तरी मंडप काढण्यास मंडळांकडून टाळाटाळ होत आहे. आधीच शहरातील रस्ते अरुंद आहेत. मंडपांनी रस्ते अडवल्यामुळे नागरिकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे.

शहरात सुमारे दीड हजार मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. मोठय़ा मंडळांची संख्या तीनशेपेक्षा जास्त होती. त्यांनी देखाव्यांसाठी मोठे मंडप उभारले होते. शिवाय विद्युत रोषणाई व कमानींसाठी पुढची बरीच जागा व्यापली होती. र्शींचे विसर्जन झाल्यानंतर हे सर्व काढणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. मंडप उभारताना कार्यकर्त्यांकडून मोठा उत्साह दाखवला जातो, मंडप काढताना मात्र सामाजिक भान राखले जात नाही.

मंडप उभारण्यासाठी रस्ता खोदला जातो. मंडप काढल्यावर या खड्डय़ांकडे मंडळांसह मनपाचेही दुर्लक्ष होते. मनपाने, तसेच मंडळांनी हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तर मनपा मंडप काढणार
विसर्जनाच्या दिवशीच संबंधित मंडळांनी मंडप काढून रस्ता मोकळा करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक मंडळांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मंडप तातडीने काढून घेण्याबाबत सर्व मंडळांना शुक्रवारी (20 सप्टेंबर) सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांचे पालन न करणार्‍या मंडळांचे मंडप मनपा स्वत: काढणार असून होणार्‍या नुकसानीला संबंधित मंडळ जबाबदार राहतील.’’ सुरेश इथापे, अतिक्रमण विभागप्रमुख.

विसजिर्त मूर्ती प्रवरेत..
विसजिर्त करण्यात आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तींची विटंबना होऊ नये, यासाठी मनपातर्फे सर्व मूर्ती प्रवरासंगम येथे नेऊन विसजिर्त करण्यात येणार आहेत. शुक्रवारी सकाळपासून हे काम सुरू झाले. पहिल्या दिवशी सुमारे 5 हजार मूर्ती प्रवरेत टाकण्यात आल्या. बाळाजी बुवा बारव, पाइपलाइन रस्ता, तसेच केडगाव येथील सर्व मूर्ती नेण्याचे काम येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल. ’’ डी. एच. किंगर, मनपा कर्मचारी, बांधकाम विभाग.

थोडा वेळ लागतोच..
मंडप उभारण्यासाठी वेगवेगळ्या ठेकेदारांकडून साहित्य आणावे लागते. त्यात लाइटींग, आरास, मूर्ती, कापड असे साहित्य असते. हे साहित्य संबंधित ठेकेदाराला काढून घ्यावे लागते. त्यासाठी थोडा वेळ लागतोच. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, अशा ठिकाणचे मंडप संबंधित मंडळांनी तातडीने काढून घेणे आवश्यक आहे. नेता सुभाष मंडळाकडून मंडप काढण्याचे काम सुरू आहे.’’ विक्रम राठोड, अध्यक्ष, नेता सुभाष मंडळ.