आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन,  मोर्चे, निदर्शने, रास्ता रोकोने दणाणले अहमदनगर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- विविध संघटनांचे मोर्चे, निदर्शने व आंदोलनांमुळे सोमवारी नगर दणाणून गेले. जिल्हा श्रमिक संघटनेने कामगार आयुक्तालयावर मोर्चा काढला, तर शिष्यवृत्ती बंद केल्याच्या निषेधार्थ तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरू करण्यासाठी भिंगार येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जीपीओ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

घरेलु कामगारांना वर्षभरात 12 गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात मिळावेत, रेशनवर धान्य, रॉकेल व अन्य 13 वस्तू मिळाव्यात, कामगारांसाठी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी जिल्हा र्शमिक संघटनेच्या वतीने घरेलु कामगार मंडळाचे सदस्य उदय भट यांच्या नेतृत्त्वाखाली दुपारी टिळक रस्त्यावरून मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सुमारे 400 ते 500 मोलकरणी सहभागी झाल्या होत्या. माळीवाडा वेस, मार्केटयार्डमार्गे कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी भट म्हणाले, सत्ताधार्‍यांची जनतेशी असलेली नाळ तुटली आहे. एकीकडे छगन भुजबळ इंडोनेशियात खाणी विकत घेत आहेत आणि दुसरीकडे मोलकरणींना साधा धनर्शी विमा योजनेचा लाभदेखील मिळत नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात घरेलु कामगार मंडळासाठी 100 कोटींची तरतूद करण्यास सरकारला भाग पाडू, असेही भट यांनी सांगितले. मोर्चात र्शमिक संघटनेचे आनंद वायकर, अनंत लोखंडे, नंदू डहाणे, बाळासाहेब सुरूडे आदी सहभागी झाले होते.

ठाकरांचे उपोषण
आदिवासी कायद्यानुसार कूळ मालकीची जमीन परत मिळावी, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील आभाळवाडी गावच्या ठाकरांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा रास्ता रोको
भिंगारमधील नागरिकांना आधारकार्ड नोंदणीसाठी नगर शहरात यावे लागते, तरीही त्यांची नोंदणी होत नाही. भिंगारमधील सर्व वॉर्डांत आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरू करावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जीपीओ चौकात रास्ता रोको करण्यात आला. कॅन्टोन्मेंट बोर्डाने जागा उपलब्ध करून दिल्यास नोंदणी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिले. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मतीन सय्यद, विशाल बेलपवार, शकील शेख, निसार कुरेशी, गोरक्ष चव्हाण, ख्वाजा पटेल, संदीप काळे आदी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांची निदर्शने
समाज कल्याण विभागाने चालू शैक्षणिक वर्षापासून केवळ केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचेच प्रस्ताव स्वीकारले. द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेतलेल्यांचे प्रस्ताव स्वीकारले नाहीत. त्यामुळे परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालय (काष्टी) व इंदिरा गांधी तंत्रनिकेतच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आमदार अनिल राठोड यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली.

चालू शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती बंद करून आर्थिक नुकसान केल्याच्या निषेधार्थ र्शीगोंदे तालुक्यातील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.