आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँक्रिटच्या रस्त्यावर "रिलायन्स'चे डांबर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वर्षभरापूर्वी केलेल्या काँक्रिटच्या रस्त्यावर पुन्हा रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून डांबर ओतण्याचा धक्कादायक प्रकार सध्या मुकुंदनगरमध्ये सुरू आहे. महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार अरुण जगताप यांच्या निधीतून मोठ्या घाईत या रस्त्याचे काम उरकण्यात आले.
एकदा नव्हे तर चक्क दोनदा काँक्रिटीकरण करूनही रस्त्याचा दर्जा न सुधारल्याने त्यावर आता डांबराचा थर देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मुकुंदनगरमधील सर्वच रस्त्यांची परिस्थिती अशी आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनाच्या विराेधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत नागरिकांना कशा प्रकारे विकासकामांचे गाजर दाखवण्यात आले, याचे उत्तम उदाहरण सध्या मुकुंदनगरमध्ये दिसत आहे. निवडणुकीला तोंड देण्यासाठी आमदार अरुण जगताप यांच्या निधीतून सुमारे दहा लाख रुपये खर्च करून जिल्हा सहकारी बँकेची शाखा ते आयशा मशीद या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, अवघ्या महिनाभरातच हा रस्ता उखडला. त्यामुळे आताचे नगरसेवक समद खान यांनी ठेकेदाराच्या माध्यमातून या रस्त्यावर पुन्हा काँक्रिटचे काम केले. दुसऱ्यांदा केलेले काँक्रिटीकरणही अवघ्या वर्षभरात उखडले. योगायोगाने रिलायन्स कंपनीने याच भागात केबललाइन टाकल्याने रस्त्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. नुकसानभरपाई म्हणून या कंपनीने रस्त्याचे काम सुरू केले, परंतु काँक्रिटच्या रस्त्यावर चक्क डांबर ओतण्यात आले.
हा सर्व प्रकार पाहून परिसरातील नागरिक महापालिकेच्या नावाने बोटं मोडत आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट झाले असतानाही संबंधित ठेकेदाराला साधी नोटीसही बजावण्यात आलेली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ एकच रस्ता नव्हे, तर मुकुंदनगरमधील सर्वच रस्त्यांचा असा बोजवारा उडाला आहे.
महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी मुकुंदनगरमधील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वारंवार आंदोलने करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. अधिकारी प्रत्येक वेळी खोटी आश्वासने देऊन वेळ मारुन नेतात. त्यामुळे मुकुंदनगरमधील नागरी समस्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे.
पुढील स्‍लाइवर वाचा, कोण आहे आंदोलनाच्‍या पवित्र्यात ..