आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँक्रिटीकरण कामातील गैरव्यवहार चव्हाट्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - नगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार सुरू आहे, एवढा आरोप करून सदस्य थांबले नाहीत, तर या गैरव्यवहाराची छायाचित्रेच त्यांनी सभागृहात सादर केल्याने पालिकेच्या बैठकीत मोठा गदारोळ उडाला. थेट पुरावेच सादर झाल्याने आणि आरोपकर्त्यात विरोधकांसोबत सत्ताधारी नगरसेवकही सहभागी झाल्याने पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला.

नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संगमनेर नगर परिषदेची बैठक झाली. मुख्याधिकारी र्शीनिवास कुरे, विविध खात्यांच्या अधिकारी व पदाधिकार्‍यांना उत्तरे दिली. पालिका सभागृहात विविध विषयांवर चर्चा होते. मात्र, या चर्चेनंतर प्रत्यक्ष कृती होत नाही. त्यामुळे पालिकेची बैठक फार्स ठरत आहे. काही पदाधिकारी आणि पालिकेचे अधिकारी परस्पर निर्णय यंत्रणा राबवत आहेत. सदस्यांच्या निर्णयाला कोणतीही किंमत नसल्याने, तसेच सदस्यांना पालिकेचे अधिकारी जुमानत नसल्याने मग बैठकांना अर्थ काय, असा सवाल विरोधी गटातील नगरसेवकांनी उपस्थित केला. शहरात सुरू असलेल्या विविध कामांत गैरव्यवहार सुरू आहे, असा आरोप त्यांनी केल्यानंतर सत्ताधारी गटाच्या एका सदस्याने या आरोपाला पुष्टी देताना काही गैरव्यवहार संदर्भातील छायाचित्रेच सभागृहात सादर केली.

पालिकेच्या बैठकीत जवळपास 70 विषयांवर चर्चा झाली. विरोधी सदस्यांसह सत्ताधारी गटाचे काही सदस्य चांगलेच आक्रमक झाल्याने ही बैठक जवळपास 7 तास सुरू होती. सकाळी सुरू झालेली बैठक संपायला संध्याकाळचे सहा वाजले. शहरात सुरू असलेल्या कामांसंदर्भात विरोधी नगरसेवक अँड. र्शीराम गणपुले यांनी प्रश्न उपस्थित करीत पूर्वसूचना देऊनदेखील चंद्रशेखर चौकातील काँक्रिटीकरणाच्या अपूर्ण कामाचे बिल ठेकेदाराला कसे काय अदा केले याची विचारणा केली. त्यामुळे विरोधी पक्षाचे गणपुले, राधावल्लभ कासट, कैलास वाकचौरे, ज्ञानेश्वर कर्पे यांनी यावेळी संबंधितांना चांगलेच खडसावले.

शिवसेनेच्या नगरसेविका अल्पना तांबे यांच्याशी पालिकेच्या एका कर्मचार्‍याने उद्धट वर्तन केल्याने हा विषयही गाजला. सत्ताधारी गटाच्या काही नगरसेविकांनीही अशीच वागणूक दिल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍याची कानउघाडणी करण्यात आली.

माजी नगराध्यक्ष व पक्षप्रतोद दुर्गा तांबे यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केल्याने नगराध्यक्षांना आपण स्वत: लक्ष घालू, असे सांगावे लागले. नितीन अभंग, जावेद जहागीरदार, विवेक कासार, इम्रान शेख, सोमेश्वर दिवटे, किशोर पवार आदींनी चर्चेत भाग घेतला.

सत्ताधार्‍यांकडून मनमानी
संगमनेर नगरपालिकेच्या रुग्णालयाच्या जागेवर ट्रॉमा सेंटर उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या मालकीची जागा इतरांना द्यायची आणि पालिकेने रुग्णालयाच्या नावाखाली दुसर्‍याच्या जागा आरक्षित करायच्या, असा उलटा उद्योग पालिकेत सत्ताधारी गटाकडून सुरू आहे. सत्ताधारी बहुमताच्या जोरावर असे उलटे करण्यात वाक्बगार आहेत. सामान्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना कोणतेही देणे-घेणे राहिलेले नाही.’’ कैलास वाकचौरे, नगरसेवक, संगमनेर.

नागरिकांना वेठीस धरू नका
प्रांताधिकारी कार्यालयाच्या परिसरात नो पार्किंग झोनच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. या कार्यालयात पे अँण्ड पार्कची सुविधा सुरू करण्यात आल्याने संबंधित ठेकेदाराला आर्थिक फायदा व्हावा, यासाठी हा प्रस्ताव आणला गेला. जर पालिकेला खरोखरच नो पाìकग झोन तयार करायचे असतील, तर त्यांनी शहरात अन्य ठिकाणीही नो पार्किंग झोन तयार करावेत. केवळ कोणाच्या तरी फायद्यासाठी नागरिकांना वेठीस धरू नये.’’ राधावल्लभ कासट, विरोधी पक्षनेते.