आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलवसुलीची मुदत संपत आली तरीही रस्ता अपूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-मनमाड रस्त्याचे कोल्हार पर्यंत चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराची पहिल्या टप्प्यातील टोलवसुलीची मुदत संपत आली, तरीही निविदा शर्तीनुसार कामे पूर्ण झालेली नाहीत. दुसरीकडे सुप्रिमो इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराची टोलवसुली बंद करण्याचा प्रस्ताव गेल्या ११ महिन्यांपासून शासनस्तरावर धुळखात पडलेला आहे. बांधकाम विभागाच्या बीअोटी प्रकल्प पाहणाऱ्या उपसचिवांकडेच हा प्रस्ताव पडून असतानाही या रस्त्याची सद्यस्थिती माहीत नसल्याचे त्यांनी माहिती आयुक्तांना लेखी कळवले आहे. या अनागोंदी कारभाराचा त्रास वाहनधारकांना होत आहे.
नगरपासून कोल्हारपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम सुप्रिमो इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराने २०११ मध्ये केले आहे. कामाची निविदा २००७ मध्ये निघाली. निविदा प्रक्रियेतून निवडलेल्या ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याने अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांनी जुलै २०११ मध्ये "सुप्रिमो'कडे काम सोपवले. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण झाल्याच्या तात्पुरत्या दाखल्यावर ठेेकेदाराने सप्टेंबर २०११ मध्ये टोलवसुली सुरू केली. त्यानंतरच्या ६० दिवसांत ठेकेदाराकडून उर्वरित कामे पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराकडून कामे पूर्ण झाली नाहीत. तत्कालीन जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्याने अधिकार नसतानाही त्यांच्या स्तरावर मार्च २०१३ मध्ये ठेकेदाराला काम पूर्णत्वाचा दाखला दिला. काम पूर्णत्वाचा दाखला मिळवलेल्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रकरण खंडपीठात गेले. ठेकेदाराने न्यायालयात काम पूर्णत्वाचा दाखला सादर केला. सुनावणीदरम्यान दाखलाच बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे हा दाखला नऊ महिन्यांच्या विलंबाने अधीक्षक अभियंत्याने रद्द ठरवला. संबंधित कार्यकारी अधिकाऱ्यावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला. दफ्तर दिरंगाई कायद्याची आतापर्यंत कधीही झळ न बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गेल्या ११ महिन्यांपासून परस्पर कामकाज करणाऱ्या कार्यकारी अभियंता व ठेकेदारावर कारवाई केली नाही. उलट रस्त्याची सद्यस्थितीच माहीत नसल्याचे उपसचिवांनी माहिती आयुक्तांना सुनावणीच्या कामकाजात कळवले आहे. संबंधित माहिती उपसचिवांनी दडवून ठेवल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी पुराव्यानिशी माहिती आयुक्तांकडे करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चौपदरीकरणासाठी ठेकेदाराला ९ वर्षे ९ महिने २३ दिवस वसुलीचा कालावधी देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सप्टेंबर २०११ ते मार्च २०१५ या कालावधीसाठी टोलवसुलीला परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील टोलवसुलीची मुदत संपण्यास साडेतीन महिने शिल्लक असतानाही ठेकेदाराने रस्त्याचे काम अजूनही पूर्ण केले नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी तात्पुरती डागडुजी केली आहे. त्यासाठी वापरलेली बारीक खडी अपघाताना निमंत्रण देत आहे.
पुढील टप्प्याचे कामही "सुप्रिमो'लाच
नगरपासून कोल्हारपर्यंत ५५ किलोमीटरचे काम अवघ्या दोन महिन्यांत तात्पुरते पूर्ण करून टोलवसुली सुरू करणाऱ्या सुप्रिमो इन्फ्रास्ट्रक्चरला कोल्हार ते कोपरगाव या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम दिले आहे. हे काम मिळवणे ठेकेदाराला सोपे व्हावे, यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीच मदत केल्याची माहिती अधिकारात उघड झाले आहे.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
^मनमाड रस्त्याच्या कामातील त्रुटीबाबत औरंगाबाद खंडपीठात न्यायालयीन लढाई सुरू आहे. टोल धोरणाला विरोध करत सत्तेत आलेल्या मुख्यमंत्र्यांकडेही रस्त्याची सद्यस्थिती व कारवाईचे प्रस्ताव अडवून धरण्याबाबत तक्रार केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाही सविस्तर कळवले आहे. त्यांच्याकडून, तरी तातडीने कारवाई व्हावी. माहिती असूनही न दिल्याबद्दल आयुक्तांकडे तक्रार केली आहे.''
शशिकांत चंगेडे, तक्रारदार.