आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शिवाजीनगर भागातील संतप्त नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नगर - कल्याण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले .)
नगर - स्वच्छ पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नसल्याने शिवाजीनगर भागातील नागरिकांनी मंगळवारी सकाळी नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे हे नागरिक विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांच्या प्रभागातील आहेत. विरोधी पक्षनेत्याच्याच प्रभागात पाण्याची बोंब आहे, तर इतर भागाचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पिण्याच्या पाण्यासह इतर नागरी समस्या येत्या चार दिवसांत सुटल्या नाहीत, तर महापालिकेसमोर चक्री उपोषण करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
शिवाजीनगर भागातील पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. प्रभागरचना बदलली, नगरसेवक बदलले, तरी हा प्रश्न जैसे थे आहे. दरवर्षी दोन-तीन आंदोलने केल्याशिवाय येथील नागरी प्रश्न सुटत नाहीत. मागील काही दिवसांपासून या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. स्थानिक नगरसेवक मनपा अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी दाद मागूनही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी परिसरातील नागरिकांनी महापालिका कार्यालयासमोर आंदोलन केले होते.
चार दिवसांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू, असे आश्वासन मनपा अधिकाऱ्यांनी दिले, परंतु ते हवेतच विरले. त्यामुळे परिसरातील नागरिक शिवसेनेचे शहर उपप्रमुख अप्पा नळकांडे, शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक विक्रम राठोड आदींच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मंगळवारी सकाळी नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

मनपाचा एकही जबाबदार अधिकारी आंदोलकाकडे फिरकला नाही. प्रभाग अधिकाऱ्याने चार दिवसांत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पिण्याच्या पाण्यासह इतर नागरी समस्या येत्या चार दिवसांत सुटल्या नाहीत, तर महापालिका कार्यालयासमोर चक्री उपोषण करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला.
शिवाजीनगर भागातील तिरुपती बालाजी सोसायटी, विणकर कॉलनी, भावनाऋषी कॉलनी, प्रशांत कॉलनी, साईराम कॉलनी आदी भागात मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. मनपाने टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. परंतु हे पाणी पुरेसे नसल्याने नळाने स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. ज्या भागातील नागरिक पाण्यासाठी रस्त्यावर उतरले, तो भाग विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांच्या प्रभागात आहे. सत्ताधाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवले नाही, तर त्यांना जाब विचारण्याचे काम विरोधी पक्षनेते करतात. परंतु येथे विरोधी पक्षनेत्याच्याच प्रभागात पिण्याच्या पाण्याची बोंब असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अंधारामुळेसुरक्षा धोक्यात
शिवाजीनगरभागात पिण्याच्या पाण्यासह रस्ते वीज या मूलभूत सुविधांची मोठी वानवा आहे. पथदिवे नसल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी बाहेर पडणेदेखील कठीण झाले आहे. चाेऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. ड्रेनेज, गटार, स्वच्छता हे प्रश्न, तर नागरिकांच्या पाचवीलाच पूजलेले आहेत. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे.
शिवाजीनगर भागातील संतप्त नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नगर - कल्याण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

विरोधी पक्षनेतेही आंदोलनात
महापालिकेचेविरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे आहे. शिवाजीनगर भागातील काही परिसर विराेधी पक्षनेत्याच्याच प्रभागात आहे. असे असतानाही शिवाजीनगर भागातील नागरिकांनी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचेच शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक विक्रम राठोड, विरोधी पक्षनेते संजय शंेडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांना करावे लागले. स्वत:च्या प्रभागातील पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ विरोधी पक्षनेते शेंडगे यांच्यावर आली. मुळातच नागरिकांनी आंदोलन करू नये, अशी शेंडगे यांची भूमिका होती. मात्र, नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने त्यांनाही नाईलाजास्तव आंदोलनात सहभागी व्हावे लागले.
यापुढे चक्री उपोषण करणार
महापालिकेकडेकर भरूनही वारंवार आंदोलने करावी लागतात, ही मोठी शोकांतिका आहे. शिवाजीनगर भागात अनेक वर्षांपासून नागरी समस्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्याकडे नगरसेवक अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आमच्याकडे आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. येत्या चार दिवसांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर मनपासमोर चक्री उपोषण करणार आहोत. कोणत्याही नगरसेवकाविरोधात आमचे आंदोलन नाही. उलट नगरसेवकांनी आमच्या प्रश्नांसाठी आंदोलनात सहभागी व्हावे, अशीच आमची अपेक्षा आहे.'' अप्पानळकांडे, त्रस्त नागरिक.