आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाह्यवळण रस्ता गेला पूर्णपणे खड्ड्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अत्यंत निकृष्ट कामामुळे नगरभोवतीच्या बाह्यवळण रस्त्याची वर्षभरातच वाट लागली आहे. या रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत, की एमआयडीसी ते कल्याण रस्तादरम्यानचा चार-पाच किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी अर्धा तास लागतो. त्यामुळे वाहनचालक पुन्हा शहरातून जाऊ लागल्याने अंतर्गत रस्त्यांवरचा वाहतुकीचा ताण वाढला आहे.
‘केवळ ठेकेदारा’ंसाठी हे ब्रीद असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरापूर्वी तयार केलेल्या वळण रस्त्याची वाट लागली आहे. विशेषत: एमआयडीसी ते कल्याण रस्त्यादरम्यानच्या रस्ता दहा मीटरही सपाट राहिलेला नाही. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून जाताना चाके इतकी खोल जातात, की वाहनाचा तोल ढळतो. त्यामुळे दररोज किमान एक वाहन उलटते आहे. ‘दिव्य मराठी’चे छायाचित्रकार शनिवारी रस्त्याची छायाचित्रे घेत असताना प्रत्येक वाहनचालक रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही करण्याची विनंती करत होता.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. विशेषत: दक्षिण भारताला उत्तरेशी जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे मोठे कंटेनर या रस्त्यावरून जातात. बाह्यवळण रस्त्यामुळे शहरातून जाणारी अवजड वाहतूक बाहेरून वळल्याने शहरातील अपघातांच्या प्रमाणात बऱ्यापैकी घट झाली होती. आता मात्र अवजड वाहने परत शहरात येऊन लागल्याने अपघातांचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित दर्जेदार केल्यास राष्ट्रवादी युवक संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नगर शहरातील रस्त्यावरील अवजड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बांधण्यात आलेला वळण रस्ता पूर्ण खराब झाला आहे. कल्याण रस्ता ते एमआयडीसीदरम्यानच्या रस्त्यावर दोन फुटांचे खड्डे पडल्याने त्यातून जाताना वाहने उलटवण्याचे प्रकार घडत आहेत.

चौपदरी रस्त्यांना जोडणारा रस्ता दुपदरी
हा बाह्यवळण रस्ता नगर-पुणे, कल्याण-विशाखापट्टणम, नगर-मनमाड, नगर-औरंगाबाद नगर-सोलापूर महामार्गांना जोडणारा आहे. यातील फक्त नगर-सोलापूर महामार्ग दुपदरी आहे. बाकीचे सर्व रस्ते चौपदरी आहेत. त्यांना जोडणारा बाह्यवळण रस्ता मात्र दुपदरी करण्याची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाने कशी काय अमलात आणली, याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आता चौपदरी करण्यासाठी पुन्हा भूसंपादन अतिशय अवघड होणार आहे. रस्ता अरुंद झाल्यामुळेच त्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. जोडीला निकृष्ट कामाचे कारण आहेच.

गुन्हे दाखल करा...
^या रस्त्याचा वापर करण्यास हलकी वाहने तर टाळाटाळ करत आहेतच, पण अवजड वाहनेही येथून जाणे टाळत आहेत. खराब अरुंद रस्त्यामुळे या रस्त्यावर अनेक जणांचा बळी गेला आहे. त्यांच्या मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले, तरच त्यांना जरब बसेल.'' हरजितसिंगवधवा, उद्योजक अध्यक्ष, मेकॅनिकल इंजिनिअर्स असोसिएशन.

दहाहून अधिक मृत्यू
आवश्यक उपाय योजना केल्याने दहाहून अधिक लोकांचा या रस्त्यावर मृत्यू झाला. जेथे बाह्यवळण रस्त्याला महामार्ग छेदतात, तेथे सिग्नल आवश्यक आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचे सार्वजनिक बांधकामला काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र अजूनही तसेच आहे. कारण अपघात टाळण्यासाठी फक्त बेकायदा गतिरोधकांची साखळी उभारण्यापलीकडे या खात्याने काहीही ठोस उपाययोजना अजून केलली दिसत नाही.

आंदोलन करणार
^रस्त्याची दुर्दशा होण्यास सार्वजनिक बांधकामचे अधिकारी जबाबदार आहेत. सामान्यांच्या खिशातून जमा झालेल्या करातून लाखोंची उधळपट्टी करून तयार झालेला रस्ता वर्षभरात कसा खराब होतो? संबंधितांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करणार आहे.'' अभिजित खोसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.
बातम्या आणखी आहेत...