आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Road Work Pending Due To Infrastructure Committee

पायाभूत समितीमुळे अडले कोपरगाव रस्त्याचे घोडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आर्थिक व इतर कारणांनी रखडलेल्या कोल्हार-शिर्डी-कोपरगाव रस्त्याच्या कामास हिरवा कंदील मिळून नऊ महिने झाले; परंतु मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत समितीची बैठकच आठ महिन्यांपासून न झाल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे शिर्डीला येणार्‍या भाविकांबरोबरच इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळणे पूर्णपणे पायाभूत समितीच्या निर्णयावर अवलंबून आहे.

नगर-कोपरगाव महामार्गाच्या नगर-कोल्हार या टप्प्याचे काम कसेबसे उरकून (अद्याप 25 टक्के अपूर्ण) तेथे टोलवसुलीही जोरात सुरू आहे. त्यापुढील कोल्हार ते कोपरगाव या महामार्गाचे काम जानेवारी 2013 मध्ये सुरू करण्याचे नियोजन होते. त्यामुळे शिर्डीला येणार्‍या भाविकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार होती. मात्र, तसे झाले नाही. कारण या कामावर अखेरचे शिक्कामोर्तब पायाभूत समिती करणार आहे.

नगरमधून जाणार्‍या औरंगाबाद, सोलापूर, पुणे या महामार्गांची कामे बीओटी तत्त्वावर होऊन त्यावरून वाहतूकही सुरळीत झाली, परंतु कोपरगाव रस्ता रखडला आहे. या रस्त्याचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू झाले. हे काम करणार्‍या सुरुवातीच्या रामा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने माघार घेतली व हे काम सुप्रिम-कोपरगाव इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले. सुप्रिमने फक्त नगर ते कोल्हारदरम्यानचे काम पूर्ण केले व टोलनाका सुरू केला. काम नगर-कोपरगाव रस्त्याचे, मात्र फक्त कोल्हारपर्यंत काम पूर्ण होऊनही सुप्रिमने टोलनाका सुरू केला, हे विशेष. उच्च न्यायालयाने कोल्हारपर्यंतच्या कामाच्या सद्यस्थितीचा अहवाल देण्याचा आदेश दिला आहे, ही यातील उल्लेखनीय बाब आहे.

या रस्त्याच्या कामात मोठय़ा प्रमाणात आर्थिक अडचणी होत्या. शिवाय कोल्हार खुर्द व कोल्हार भगवतीपूर दरम्यानच्या प्रवरेवरील पुलाचे काम रखडले आहे. पुलाचे काम झाले, पण दोन्ही बाजूंच्या भरावाचे काम रखडल्याने हा पूल सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे सध्याच्या अरुंद पुलावर सातत्याने कोंडी होऊन वाहतुकीला कायमच अडथळा निर्माण होत आहे. सध्या या पुलावर अनेक आडवे खोल चर निर्माण झाले आहेत. वाहने त्यात आदळत सावकाश पुढे सरकतात.

कोल्हार-कोपरगाव हा टप्पा 41.8 किलोमीटर लांबीचा आहे. त्यात प्रामुख्याने शिर्डी येत असल्याने तो अतिशय महत्त्वाचा आहे. या रस्त्याचे 35 टक्के काम झाले आहे. यात सरकारचे फारसे नुकसान झालेले नसले, तरी जनतेला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे काम ठेकेदाराला दिलेले असल्याने सरकारला फारसे काही करता येत नव्हते. खरेतर सरकारने वाट न पाहता हे काम स्वत:च ताब्यात घेऊन पूर्ण करणे गरजेचे होते, असे तज्ज्ञांचे मत होते. पण त्यात विलंब होण्याची भीती असल्याने सरकारी यंत्रणा बँकांत सहमती होण्याची वाट पाहत होत्या. ही सहमती झाल्याने या प्रकल्पाला अर्थसाह्य करण्यातील अडथळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच दूर झाले आहेत. या प्रकल्पाला युको बँकेसह महाराष्ट्र, कॅनरा, आयडीबीआय व युनियन अशा पाच बँका अर्थसाह्य करणार आहेत. त्यात समन्वयाची भूमिका युको बँकेकडे आहे. या कामाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे, पण छाननी व पायाभूत समितीचे शिक्कामोर्तब बाकी असल्याने काम रखडले आहे.


पायाभूत सुविधांबाबत सरकारी उदासीनता
रस्ते हे विकासाच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. विकासासाठी पायाभूत सुविधा आवश्यक असतात. इतक्या महत्त्वाच्या सुविधांसाठी असलेल्या पायाभूत समितीची बैठक दीड वर्षातून एकदा होत असल्याचे उघड झाले आहे. या समितीची या आधीची बैठक गेल्या वर्षी 21 नोव्हेंबर रोजी झाली होती. त्याआधी दीड वर्षापूर्वी ही बैठक झाली होती. यावरून सरकार पायाभूत सुविधा व एकूणच विकासाबाबत किती गंभीर आहे, हे उघड झाले आहे.


लवकरच प्रश्न मार्गी लागणार
कोल्हार-शिर्डी-कोपरगाव रस्त्याच्या कामाबाबत निर्णय फक्त पायाभूत समितीच घेऊ शकते. कारण हे काम 100 कोटींहून अधिक खर्चाचे आहे. बैठक लांबल्यानेच रखडले आहे. ही बैठक मागील 17 जुलैला होणार होती. ती पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच ही बैठक होऊन त्यात रस्त्याचा कामाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.’’ यू. एस. शेकडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

पंधरा कोटी गेले खड्डय़ांत..
कोल्हार-कोपरगाव हा रस्ता प्रचंड खराब झाला आहे. खूप ओरड झाल्यानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकामने खर्च केला. प्रत्येक टप्प्यात पाच कोटी असा तीन टप्प्यांत 15 कोटींचा खर्च होऊनही हा रस्ता अद्याप खराबच आहे. इतक्या पैशांत चांगला रस्ता तयार होऊ शकला असता, अशी प्रतिक्रिया सन्माननीय नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोहोळे यांनी व्यक्त केली.