आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यातील तीन दरोडेखोरांना पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा - चोपडा-शिरपूर रस्त्यावर हातेड गावाजवळ दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. दोघे जण पळून गेले. आरोपींकडून तीन जिवंत काडतुसे व दोन गावठी पिस्तूल (कट्टा) आणि इंडिका कार जप्त केली आहे .

नेवासा (नगर) येथील फिरोज रहेमान शेख यांच्यासह पाच जण एमएच 12 डीटी 1964 या इंडिका गाडीतून प्रवास करीत होते. हातेड गावाजवळ पोलिसांनी या गाडीला अडवून कागदपत्रे मागितली. परंतु फिरोज रहेमान शेख याने कागदपत्रे नसल्याचे सांगत लाच देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचे म्हणणे न ऐकता गाडीची चावी ताब्यात घेतली. या वेळी दादासाहेब लक्ष्मण विटनेर (27, रा. मांजरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर), गायकवाड (पूर्ण नाव कळू शकलेले नाही) हे दोघे जण पसार झाले. पोलिसांनी कारवाई करीत गाडीतील फिरोज रहेमान शेख (26, घोडगाव, ता. नेवासा), महेश भाऊसाहेब थोरे (22, श्रीरामपूर), पप्पू उर्फ अशोक बाबासाहेब चेडवळ (17, गुंजाळे, ता.राहुरी) यांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता, दोन गावठी पिस्तुलासह सहा जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी शस्त्रे जप्त करून इंडिका कारही ताब्यात घेतली आहे.

पोलिस कॉन्स्टेबल गणेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसात वरील पाचही आरोपीविरुद्ध कलम 399, आर्म अँक्ट 3/25नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक विश्वास वळवी करीत आहेत.

शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी : आरोपी फिरोज रहेमान शेख याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून राहुरीजवळ असलेल्या सोनई पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दरोड्याचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. चोपडा तालुक्यातील आदिवासी परिसराची त्याला माहिती असून यापूर्वी गांजाची तस्करी केल्याची माहिती प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी वाय.डी. पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.