आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगावात अट्टल दरोडेखोरास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - शहरातील सिद्धिविनायक वसाहतीमधून मारुती कार चोरून शास्त्रीनगर भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांच्या टोळीतील एकास शेवगाव पोलिसांनी पाठलाग करून हत्यारासह जेरबंद केले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अनंत भंडे, पोलिस नाईक भाऊसाहेब तांबे, सुनील भोईटे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे केली.

शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भंडे यांच्या नेतृत्वाखालील पथक रात्रीची गस्त घालत होते. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास निर्मलनगर येथील प्राध्यापिका रूपाली खेडकर-मुधोळकर यांच्या बंगल्यात चोर घुसल्याची माहिती पथकाला मिळाली.

पोलिसांच्या पथकाला पाथर्डी रस्त्याने एक मारुती कार भरधाव वेगाने जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चोरट्याला पाठलाग करून पकडले. आरोपीने कमरेला खोसलेल्या सुर्‍याने भंडे याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भंडे यांनी तो चुकवला.

चार दरोडेखोर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी नरसिंग अत्तरसिंग बावरी (35, शिकलकरी मोहल्ला, जालना) याला अटक केली. पोलिस चौकशीनंतर राजूसिंग कल्याणसिंग भादा, समरसिंग अघरणे बावरी, लालूसिंग जिलोसिंग कलाणी, पोलादसिंग मायासिंग टाक (सर्व शिकलकरी मोहल्ला, जालना) यांच्याविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.