आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बत्तीस लाखांच्या तंबाखूचा कंटेनर लुटणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारातील हॉटेल उत्सवसमोरून ३२ लाख किमतीची आयटीसी कंपनीची तंबाखू कंटेनरसह पळवणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी जेरबंद केले. आरोपींमध्ये एक महिलेचाही समावेश आहे. ही घटना ऑक्टोबरला सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी रामभरोसे विजयसिंग चौहान (३८, सतलापूर मंडीदीप, ता. मोहरगंज, रायसेन, मध्यप्रदेश) यांच्या फिर्यादीवरून सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

फिर्यादी चौहान हे हाॅटेल उत्सवसमोर कंटेनर उभा करून फोनवर बोलत होते. क्वालिसमधून आलेल्या चोरट्यांनी कंटेनरला कार अाडवी लावून पोलिस असल्याचे सांगत चौहान यांना खाली उतरवले. हात-पाय बांधून त्यांना क्वालिसमध्ये बसवून कंटेनर, कंटनेरमधील आयटीसी कंपनीचे तंबाखुचे ५७ बॉक्स, मोबाइल, रोख पाच हजार रुपये असा एकूण ३२ लाख सहा हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा मुद्देमाल मनमाड- दहेगाव येथे सोडून हे चोरटे पसार झाले. 

पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने दोन पथके तयार करून आरोपींना ताब्यात घेतले. नगर-पुणे महामार्गावरील रांजणगाव ते मनमाड येथील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती, तसेच गुप्त माहितीनुसार आरोपींना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. 

शुभम दीपक बच्छाव (रा. माधवनगर, नाशिक), अनिल रामदास अहिरे (गावडे निवास चाळ, महालक्ष्मीनगर, अंबरनाथ पूर्व), आकाश दिगंबर फंड (केमवाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) माणिकराव सांगळे (बुथलवाडी, नाशिक) यांच्यासह अन्य दोन-चार अनोळखी व्यक्तींनी मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी, दुचाकी, तसेच मोबाइल असा एकूण सहा लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सुपे पोलिस करत आहेत. 

या आरोपींना पकडले 
विशालगुलाब वाघ (बुधलवाडी, ता. नांदगाव, जि. नाशिक), ज्योतिराम रामदास परदेशी (कुमावतनगर, मखबलाबाद नाका, पंचवटी, नाशिक), ज्योतिराम जनार्दन पाटील (पडसाली, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) अाशा नानासाहेब निकम अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...