आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डझनभर दरोड्यांसह पाच खुनांची कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - शुक्रवारी (15 फेब्रुवारी) रात्री साडेआठला महामार्गावर पोलिसांवर गोळीबार करणारे चौघेही खतरनाक गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले. प्राथमिक चौकशीत या टोळीने डझनभर दरोड्यांसह पाच खून केल्याची कबुली दिली आहे. जखमी आरोपी वगळता उर्वरित तिघांना न्यायालयाने 26 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री पोलिस आणि चौघा गुन्हेगारांत चकमक उडाली. आरोपींनी केलेल्या गोळीबारात घारगावचे पोलिस निरीक्षक वसंत तांबे जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक आरोपी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने संतोष ऊर्फ लुभ्या चिंतामण चांदूलकर (30, लवळे, ता. मुळशी), संतोष मच्छिंद्र जगताप (26, मोरवाडी, पिंपरी-चिंचवड), राजू महादू पाथरे (23, विद्यानगर, चिंचवड) आणि सत्यपाल महादेव रुपनवर (22, जांब, ता. इंदापूर) अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून नव्या बोलेरोसह चार पिस्तुले, दोन मोबाइल व काही काडतुसे हस्तगत करण्यात आली.

शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करणे, रोख रकमेसह वाहन पळवणे आणि कोणी विरोध केला तर गोळ्या घालून हत्या करणे अशी आरोपींची गुन्ह्याची पद्धती होती. घटनेनंतर त्या जिल्ह्यातून थेट दुसर्‍या जिल्ह्यात पळून जाणे आणि वर्तमानपत्र वाचून आपण केलेल्या गुन्ह्यात आपले नाव आले नाही ना याची खात्री करीत राहणे अशी काळजी ते बाळगत असत. वातावरण शांत होईपर्यत दुसर्‍या जिल्ह्यात गुन्हे करणे हा या टोळीचा नित्यक्रम. लूट, खून, चोर्‍या, खंडणी आदी 100 हून अधिक गुन्हे या टोळीच्या नावावर आहेत.

पुणे व नगर पोलिसांनी या टोळीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. संतोष चांदूलकर हा मुख्य सूत्रधार असून एकूण 17 साथीदार असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यापैकी चांदूलकरसह केवळ चौघांना पकडण्यात पोलिस यशस्वी ठरले. ही टोळी संगमनेर ग्रामीण पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पुणे पोलिसांनी ही शोधमोहीम राबवत त्यांच्या काही साथीदारांना पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपींपैकी सत्यपाल महादेव रुपनवर हा इंदापूर येथील दत्तात्रेय गायकवाड यांच्या खुनातील मुख्य आरोपी आहे. याच टोळीने गायकवाड यांचा खून केल्याचे पुढे आले. संगमनेर पोलिसांनी या टोळीला पकडल्यानंतर त्यांच्याकडे असलेली नवी बोलेरो सातारा येथून शुक्रवारी (15 फेब्रुवारीला) लांबवल्याचे त्यांनी कबूल केले. बोलेरोच्या मालकाला जंगलात फेकून ही टोळी लगेचच संगमनेरच्या पठारी भागात आर्शयाला आली होती. मात्र, आधी कोपरगावच्या रामचंद्र नामदेव सांगळे यांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडील मोटार त्यांनी पळवली होती. या गुन्ह्यात घारगाव पोलिस त्यांच्या मागावर होते. आरोपी पठार भागात येणार असल्याची टीप मिळाली आणि या टोळीचे भांडे फुटले. दरम्यान, दरोडेखोर आणि त्यांचे इतर साथीदार यांच्याबाबत माहिती मिळवणे आणि प्रकरणाचे धागेदोरे जुळवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती घारगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत तांबे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह गायब
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडे आढळलेली बोलेरो चोरीची असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावरील नंबर प्लेटवर मागे व पुढे राष्ट्रवादीचे घड्याळ होते. घटनेनंतर हे चिन्ह काही वेळातच गायब झाल्याचे दिसले. तसेच गाडीत बनावट नंबरप्लेट, चादरी, ब्लँकेट आदी वस्तू आढळल्या.

अनेक प्रकरणांचा गुंता सुटला
संतोष ऊर्फ लुभ्या चांदूलकरसह संतोष जगताप, राजू पाथरे व सत्यपाल रुपनवर यांना संगमनेर पोलिसांनी पकडल्यानंतर पुणे, बारामती पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत गायकवाड खून प्रकरणातील आणखी तिघांना अटक केली आहे. त्याव्यतिरिक्त टोळीतील मंगेश माणिक कांचन, सतीश किसन कुर्‍हाडे, गणेश मोहन बुचवडे, नवनाथ विलास चव्हाण, विजय ऊर्फ सुभाष खवले व संजय वीरप्पा वाघमोडे यांची नावे पुढे आली असून ते फरारी आहेत.

वरूडी पठारचे प्रेम
संगमनेरच्या वरूडी पठारमध्ये गुन्हेगारांचे लागेबांधे आहेत. तेथे त्यांचे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे मित्र असल्याचीही माहीती पुढे आली असून त्यांच्यामुळेच या गुन्हेगारांना या भागात आर्शय मिळत होता. इंदापूर येथील दत्ताराम गायकवाड व पुण्यातील गुन्हेगार बाळ शांताराम ढोरे यांची हत्या केल्याची कबुली या टोळीने दिली. सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर पश्चिम महाराष्ट्राच्या पट्टय़ात या गुन्हेगारी टोळीची पाळेमुळे आहेत.