आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्याच्या घरात चोरी; लाखोंचा ऐवज लांबवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - शहर तालुक्यातील चोऱ्यांचे सत्र आणखी वाढले असून शनिवारी पहाटे भर बाजारपेठेत चोरट्याने जबरी चोरी करत सुमारे पंधरा तोळे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी रोख पाच लाख रुपये असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी किराणा व्यापारी सोमनाथ पलोड यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

गणेश पेठेमध्ये पलोड यांचे किराणा दुकान असून सुमारे शंभर फूट अंतरावर त्यांचे घर आहे. रात्री दोनपर्यंत सोमनाथ पलोड जागे होते. त्यांच्या पत्नी राजस्थानमध्ये धार्मिक कार्यासाठी गेल्या आहेत. पुढच्या हॉलमध्ये झोपलेल्या पलोड यांना शेजारी किचनमधील हालचालींचा अंदाज आला नाही. चोरट्यांनी किचनच्या दाराचा काेयंडा तोडून घरात प्रवेश केला. नंतर चोरट्यांनी राेख पाच लाख, पंधरा तोळे सोन्याचे दागिने, पूजेची चांदीची भांडी चोरून नेले. दरम्यान, चोरट्यांनी कपाटातील मोबाइल घड्याळे तेथेच ठेवली. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पलोड यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी शेजारी असलेल्या रंगार गल्लीतील प्रकाश बजाज यांच्या गोदामाचे कुलूप तोडले. परंतु या ठिकाणच्या रिकाम्या गोण्या प्लास्टिकचे डबे पाहून कुलूप तेथेच टाकून चोरटे पसार झाले. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
गांधी चौकापर्यंतच माग दाखवत श्वानपथक तेथे थांबले. चार दिवसांपूर्वी पलोड यांच्या दुकानापासून जवळच असलेल्या बागवान यांच्या घरी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा आतून धरत बागवान कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी पलायन केले होते. यापूर्वी मोबाइल शॉपी, हॉटेलमध्ये झालेल्या चोऱ्यांचाही अद्याप तपास नाही. पोलिसांची गस्त ज्या दिवशी अावश्यक असते त्या दिवशी स्थानिक पोलिसांना शिंगणापूर शिर्डी येथे बंदोबस्त असतो. या धाडसी चोरीमुळे सामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दिवसभर पलोड यांना धीर देण्यासाठी नागरिक, पदाधिकारी कार्यकर्ते यांची वर्दळ होती. पोलिस उपाधीक्षक वाय. डी. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या.

पोलिसांनी दाखवला सोन्याचा भाव कमी
सुमारेपंधरा तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. लग्नात सासुरवाडीकडून दागिने आल्याचे पलोड यांनी सांगितले. सोन्याचा सध्याचा भाव प्रतितोळा सुमारे २७ हजार रुपये आहे. परंतु पोलिसांनी सोन्याचा भाव त्यांचे लग्न झाले त्यावेळेचा सुमारे तीस वर्षांपूर्वीचा प्रतितोळा १८०० रुपये पकडला. त्यामुळे रोख रकमेसह लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची नोंद करण्यात आली. गेलेली रक्कम कमी दिसावी म्हणून पोलिसांनी हा अट्टहास केल्याची चर्चा आहे.