आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री, वकील, पोलिसांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न; व्हीआयपींना चोरट्यांनी केले लक्ष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- माजीमंत्री बबनराव पाचपुतेंसह तहसीलदार महेंद्र माळी, पब्लिक नोटरी अॅड. जे. डी. अनभुले चार पोलिसांच्या घरी रविवारी रात्री दरोड्याचा प्रयत्न झाला. यात ऐवज गेलेला नाही; मात्र एकाच वेळी व्हीआयपींना चोरट्यांनी लक्ष्य केल्याने संपूर्ण शहरात दहशत पसरली आहे.
 
येथील शनिचौकाजवळ माजी मंत्री पाचपुते यांचे माउली निवासस्थान कार्यालय आहे. पाचपुते कुटुंबीयांपैकी कोणीही रात्री घरी नव्हते. चोरट्यांनी पाचपुतेंच्या कार्यालयाचा दर्शनी दरवाजा कुलूप तोडून उघडला. त्याला लागून असलेल्या आतील कार्यालयात प्रवेश करून आतील साहित्य अस्ताव्यस्त केले. कार्यालयाबाहेरील कक्षात राहणाऱ्या पाचपुतेंच्या कामगाराला जाग आल्याने चोरट्यांनी पलायन केले.
 
त्यानंतर जवळच राहत असलेले पब्लिक नोटरी अॅड. अनभुले यांचे घर फोडले. अनभुले कुटुंबीय त्यांच्या फार्महाउसवर होते. चोरट्यांना तेथेही रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला तो तहसीलदार महेंद्र माळी यांच्या निवासस्थानाकडे. त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडला. आत शिरण्यापूर्वीच चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला.
 
त्यानंतर चोरट्यांना स्वारी गेली ती शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या पोलिसांच्या घरी. तेथे राहणाऱ्या चार पोलिसांच्या घराचे दरवाजे तोडण्याचे उघडण्याचे प्रयत्न केले. पैकी दोन घरात त्यांनी प्रवेश केला आतील सामनाची फेकाफेक केली. सुनील निकम, दादा टाके हवालदार कराळे या पोलिसांच्या घरासह महिला पोलिस तोरडमल यांचे घर चोरट्यांचे लक्ष्य ठरले.
 
या प्रकारानंतर जवळच राहणारे ज्ञानेश्वर खेतमाळीस यांनी पाहून आरडाओरडा केला. एकाच रात्री एका मागोमाग एवढ्या कारवाया करूनही चोरट्यांच्या हाती एक छदामही लागली नाही, हे विशेष. कोणाचाही ऐवज गेला नसल्याने ज्ञानेश्वर खेतमाळीस वगळता कोणीही फिर्याद दिली नाही.
 
व्हीआयपी असुरक्षित
याप्रकारानंतर श्रीगोंदे शहरात सामान्यांत दहशत पसरली आहे. व्हीआयपी पोलिसच जर असुरक्षित असतील, तर सामान्यांचे काय? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. चोरट्यांचा उद्देश काय होता, याबाबतदेखील सध्या उलटसुलट चर्चा आहे.
बातम्या आणखी आहेत...