आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rode Murder Case: One Man Arrested News In Marathi

रोडे दुहेरी खूनप्रकरणी एकास अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विनायकनगर परिसरातील समतानगर कॉलनीत राहणाऱ्या मीनाक्षी व प्रकाश गुलाब रोडे या दाम्पत्याच्या खून प्रकरणी एका आरोपीला गजाआड करण्यात आले. लखन उर्फ ढोल्या नारायण भोसले (१८, आष्टी, जि. बीड) असे पोलिसांनी अटक केलेल्या अारोपीचे नाव आहे. बुधवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत (१५ डिसेंबर) पोलिस कोठडी सुनावली.
१८ सप्टेंबरच्या पहाटेच्या सुमारास हल्लेखोरांनी प्रकाश व मीनाक्षी रोडे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खून केला होता. प्रकाश रोडे एल अँड टी कंपनीत नोकरीला होते. पोलिसांना आरोपी सापडत नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. याप्रकरणी रोडे कुटुंबीयांनी व परिसरातील आजी-माजी नगरसेवकांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटून तपासाची मागणी केली होती. याप्रकरणी लखन याला मंगळवारी अटक करण्यात आले.
लखन उर्फ ढोल्या याला श्रीगोंदे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात अटक केली हाेती. त्याच्याकडे मिळालेल्या मोटारसायकल (एमएच १६ एके ५०४५ ) बाबत पोलिसांनी कसून चौकशी केली. पण, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. तपासाअंती ही मोटारसायकल प्रकाश रोडे यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मंगळवारी लखन भोसले याला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. बुधवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याच्या अधिक तपासाकरिता त्याला पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक खंडेराव रंजवे व सरकारी अभियोक्ता मुरलीधर पवार यांनी न्यायालयात केली. ती मान्य करीत न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलिस अधिक तपास करत आहेत.