आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहयोतील घोटाळा : 24 अधिकारी व कर्मचारी अडचणीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - रोजगारी हमी योजनेंतर्गत सिंचन सुविधेसाठी सुमारे दोन हजार विहिरींची कामे पूर्ण झाली. यापैकी काही कामांत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी 24 अधिकारी व कर्मचारी अडचणीत आले असून त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात दोन वर्षे दुष्काळ असल्याने रोहयोतून बेरोजगारांच्या हाताला काम देण्यात आले. वैयक्तिक सिंचनासाठी 2012-2013 या वर्षात 5949 विहिरींना मंजुरी मिळाली. पैकी अवघ्या 40 टक्केच विहिरींची कामे पूर्ण होऊ शकली. दरम्यान, विहिरींच्या कामात अपहार झाल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या. विहिरींची कामे करताना यंत्रसामग्रीचा वापर करणे, कंत्राटदारामार्फत काम करून घेणे, प्रवर्ग डावलून योजनेचा लाभ दिल्यास दोषींची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

तक्रार निवारण प्राधिकार्‍याने केलेल्या चौकशीत लाभार्थीचे सलग क्षेत्र नसताना विहिरी मंजूर करणे, विहिरी मंजूर करताना आर्थिक देवाण-घेवाण करणे, विहीर मंजूर नसताना कामे सुरू करणे, विहीर अस्तित्वात असताना नसल्याचे खोटे पंचनामे करणे, जुन्याच विहिरी दाखवून नवीन विहिरीचे अनुदान लाटणे, यंत्रांच्या साहाय्याने कामे करणे, अपात्र लाभार्थीला विहिरी मंजूर करणे आदी प्रकार आढळून आले. या कामांना मंजुरी देणार्‍या गट विकास अधिकार्‍यांसह जबाबदार अधिकार्‍यांवर ठपका ठेवून विभाग स्तरावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. विहिरींच्या कामात आढळून आलेल्या अनियमिततेप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सर्व गट विकास अधिकार्‍यांना प्रकरणे मंजूर करताना खबरदारी घेण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.

पुढील वर्षीसाठी रोहयो कामांच्या पंचायत समित्यांच्या प्रस्तावांचा एकत्रित आराखडा विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. वास्तविक हा आराखडा जि. प. सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवणे अपेक्षित होते. मात्र, महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आराखडा आयुक्तांकडे पाठवल्याचे अधिकार्‍यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

14 कोटींचा खर्च
जिल्ह्यात 2 हजार 78 विहिरींची कामे पूर्ण झाली असून 3 हजार 871 कामे अपूर्ण आहेत. रोहयोंतर्गत पूर्ण झालेल्या विहिरींवर आतापर्यंत 14 कोटी 27 लाख 48 हजार रुपये खर्च झाला असून अपूर्ण कामे प्रगतिपथावर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

35,370 नव्या विहिरी
42014-2015 या वर्षासाठी आराखडा तयार करण्यात आला असून रोहयोअंतर्गत नव्याने 35 हजार 370 विहिरी प्रस्तावित केल्या आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समित्यांमार्फत जिल्हा परिषदेकडे प्राप्त विविध कामांचा 1 हजार 808 कोटींचा एकत्रित आराखडा विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.’’ अरविंद धारस्कर, गट विकास अधिकारी, रोहयो

9 प्रकरणांत कारवाई
विहिरींच्या कामात आढळून आलेल्या अनियमिततेच्या 9 प्रकरणांत 2 गट विकास अधिकारी, 4 शाखा अभियंता, 3 विस्तार अधिकारी, 7 ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, लिपिक, कृषी अधिकारी, स्थापत्य अभियंता प्रत्येकी एक अधिकारी अडचणीत आला आहे. त्यांच्यावर लवकरच शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.