श्रीरामपूर - विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर व राहाता हे दोन मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला मिळावेत, अशी मागणी करून कृषिमंत्री राधाकृष्ण विखेंचा पराभव रिपब्लिकन पक्ष करू शकतो, असा विश्वास पक्षाचे रा ष्ट्रीय उपाध्यक्ष तानसेन रणनवरे यांनी व्यक्त केला.
शासकीय विश्रामगृहावर रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत रणनवरे बोलत होते. यावेळी राज्य सचिव विजय वाकचौरे, श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष भीमा बागूल, अशोक गायकवाड, शहरप्रमुख संतोष ढोकणे, महेंद्र गायकवाड उपस्थित होते.
रणनवरे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाने मागणी केलेल्या मतदारसंघात बौद्ध उमेदवार द्यावा, असा आग्रह पक्ष धरणार आहे. शिर्डी लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस व रा ष्ट्रवादीने संगनमताने रामदास आठवले यांचा पराभव केला. मागासवर्गीय, दलित व मुस्लिम मतदार आपल्या बाजूने आहेत, असा कॉँग्रेसचा समज होता. कॉँग्रेसने समाजाचे अपहरण करून सत्ता मिळवली होती. त्यामुळे त्याला धक्का देणे गरजेचे होते. त्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांना दलित समाजाने मते दिली. नगर जिल्ह्याचे विभाजन झाले, तर जिल्ह्याचे शहर म्हणून श्रीरामपूरचीच मागणी करणार आहोत, असेही रणनवरे म्हणाले.
ससाणे यांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, त्यांच्या प्रवेशाला रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध असेल. राज ठाकरे यांना महायुतीत घेऊ नये, अशी पक्षाची ठाम भूमिका आहे, असे रिपाइंचे रा ष्ट्रीय उपाध्यक्ष तानसेन रणनवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.