आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्ता आल्यास रिपाइंचाच उपमुख्यमंत्री; रामदास आठवलेंचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाची चर्चा लवकर संपवण्याची मागणी शिवसेना-भाजपकडे केली आहे. महायुतीची सत्ता आली, तर उपमुख्यमंत्रिपदावर रिपाइं दावा करणार आहे, असे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी सांगितले. लोकसभेसाठी 7, तर विधानसभेकरिता 27 जागांची आमची मागणी आहे. त्यापैकी लोकसभेच्या 4, तर विधानसभेच्या 24 जागा मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे. रिपाइंला सोबत घेतल्याशिवाय महायुतीला सत्ता मिळणे कठीण आहे. काही मुद्दय़ांवर मतभेद असले तरीही एकत्र येणे भाग आहे. असेही आठवले म्हणाले.

शासकीय विर्शामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, लोकसभेसाठी मागणी केलेल्या जागांमध्ये शिर्डीचा समावेश नाही. शिर्डीऐवजी दक्षिण-मध्य मुंबईच्या जागेची मागणी असल्याचे, तसेच मराठवाड्यातील लातूर, विदर्भात रामटेकची जागा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सातारा येथील जागेसाठी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना रिपाइंतर्फे तिकीट देण्याची तयारीही आठवले यांनी या वेळी दर्शवली.

राज ठाकरे यांना पुन्हा निमंत्रण
काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेवरून खाली खेचायचे असेल, तर मनसेने महायुतीमध्ये यावे, असे आठवले म्हणाले. मुख्यत्वे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदावरून राज व उद्धव यांच्यामध्ये वाद होते. राज्याचे हित लक्षात घेऊन वाद विसरून राज यांनी महायुतीत यावे. मनसेचा शिवसेनेला जास्त फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र आले पाहिजे. सत्तास्थापनेसाठी तरी महायुतीला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. मुंबईतील बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. अशा गुन्हय़ांत हातपाय तोडण्याची शिक्षा असावी, असे मतही आठवले यांनी या वेळी व्यक्त केले.