आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त वाहतुकीला आळा; दंडात वाढ, कठोर पावले उचलण्यात येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बेशिस्त वाहन चालकांना वाहनमालकांना वठणीवर आणण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत वाढ केली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजाराम गिते यांनी शुक्रवारी दिली. याबाबत राज्यपाल विद्यासागर राव यांनी जारी केलेल्या आदेशाची नगरमध्येही काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. वाहतूक पोलिसही आता बेशिस्त वाहनचालकांवर या आदेशानुसार कारवाई करू शकणार आहेत.
मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम २०० नुसार राज्य शासनास बेशिस्त वाहनचालकांना दंड करण्याचा अधिकार आहे. परंतु ही रक्कम किरकोळ असल्याने वाहनचालकांच्या बेशिस्तीचे प्रमाण वाढले होते. बेशिस्तीवर नियंत्रण आणण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करणे आवश्यक होते. त्यानुसार आता दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. वाहनचालकांनी नव्या आदेशाचे काटेकोर पालन करावे, वाहतूक पोलिस उपप्रादेशिक परिवहन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही आरटीओ गिते यांनी केले आहे.

नव्या नियमानुसार विनाहेल्मेट, विनापरवाना वाहन चालवणे, शारीरिक, मानसिकदृष्ट्या अपात्र असताना गाडी चालवणे, अधिकाऱ्यांच्या सूचनांचे उल्लंघन करणे या गुन्ह्यांसाठी ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. वाहनांच्या नंबरप्लेट विहित पद्धतीने क्रमांक लिहिणे, रिफ्लेक्टर्स-टेललाइट नसणे, अनधिकृत व्यक्तीस वाहन देणे, अतिवेगाने धोकादायकपणे वाहन चालवणे, वाहनात अवैध बदल करणे, विनानोंदणी दुचाकी वाहन चालवणे या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

वाहनांची शर्यत लावणे, विनानोंदणी चारचाकी वाहन चालवणे, विमा नसताना वाहन चालवणे या गुन्ह्यांसाठी दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
अाजवर हेल्मेट घातल्यास केवळ १०० रुपये दंड अाकारला जात हाेता. विनापरवाना वाहन चालवणाऱ्या वाहनचालकाला मालकालाही आता पाचशे रुपयांचा दंड होईल. विमा नसलेल्या वाहन मालकाला दोन हजार रुपये चालकाला तीनशे रुपये दंड होईल. अतिवेगाने वाहन चालवल्यास मालक चालकांना एक हजार रुपये दंड होईल.

अवजड वाहतुकीला आळा घालण्याचा प्रयत्न
ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या दंडात वाढ करण्यात आली आहे. एक टनापेक्षा अधिक माल वाहतूक करणाऱ्या वाहनमालकाला पाचशे चालकाला पाचशे रुपये दंड होईल. दोन टनांपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या मालकाला दीड हजार रुपये चालकालाही दीड हजार रुपये दंड होईल. तीन टनांपेक्षा अधिक माल वाहतूक करणाऱ्या मालकाला तीन हजार रुपये चालकाला तीन हजार रुपये दंड होईल. तीन टनांपेक्षा अधिक माल वाहतूक करणाऱ्या वाहनमालकाला दोन हजार रुपये चालकाला दोन हजार रुपये दंड आकारला जाईल.
बातम्या आणखी आहेत...