आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ ठिकाणी सभापती, उपसभापती बिनविरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर, संगमनेर, राहुरी, कोपरगाव, जामखेड, नेवासे, कर्जत, शेवगाव व पारनेर येथे पंचायत समिती सभापती, उपसभापतींची बिनविरोध निवड झाली. पाथर्डी, श्रीगोंदे व अकोले येथे मतदान घेण्यात आले.

नगरमध्ये संदेश कार्ले
सभापतिपदी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश कार्ले यांची निवड झाली, तर उपसभापतिपदासाठी भाजपचे शरद झोडगे यांना पुन्हा संधी देण्यात आली. आमदार शिवाजी कर्डिले व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी प्रत्येक सदस्याला स्वतंत्र बोलावून मते जाणून घेतली. नंतर सभापतिपदासाठी कार्ले, तर उपसभापतिपदासाठी झोडगे यांचे नाव जाहीर केले. तोपर्यंत राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांनी सभापतिपदासाठी, तर काँग्रेसच्या अरुण होळकर गटाच्या उज्ज्वला कापसे यांनी उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केले होते. दुपारी काँग्रेसचे बाळासाहेब हराळ दोन पंचायत समिती सदस्यांसह युतीत सहभागी झाले. काँग्रेसच्या दोन सदस्यांमुळे युतीकडे ९, तर विरोधकांकडे ३ सदस्य राहिले. अखेरच्या टप्प्यात मोकाटे व कापसे यांनी अर्ज मागे घेतले.

संगमनेरात काँग्रेसच्या नवले
अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. सभापतिपदी रावसाहेब दगडू नवले व उपसभापतिपदी शालिनी ढोले यांची निवड झाली. राष्ट्रवादीच्या सरुनाथ उंबरकर यांना उपसभापतिपद देऊन आघाडी धर्म पाळण्याची राष्ट्रवादीची मागणी सत्ताधारी काँग्रेसने धुडकावली. सभापती सुरेखा मोरे आजारी असल्याने, तर विखे गटाच्या सखुबाई सांगळे सभागृहात उपस्थित नव्हत्या.

राहुरीत मंगल निमसे
सभापतिपदी काँग्रेसच्या मंगल ज्ञानदेव निमसे, तर उपाध्यक्षपदी मंदा वसंत डुक्रे यांची बिनविरोध निवड झाली. निमसे या चौथ्या महिला सभापती झाल्या. यापूर्वी सुनीता निमसे, शकुंतला डोळस, शशिकला पाटील या सभापती झाल्या होत्या.

कोपरगावला देवकर
सभापतिपदी बिपीन कोल्हे गटाचे सुनील अंबादास देवकर, तर उपसभापतिपदी वैशाली विजय साळुंके यांची बिनविरोध निवड झाली. देवकर हे आतापर्यंतचे सर्वांत तरुण सभापती ठरले आहेत.

जामखेडला भाजपचा झेंडा
सभापतिपदी भाजपचे डॉ. भगवान मुरुमकर यांची पुनश्च, तर उपसभापतिपदी यमुनाबाई घनश्याम मोरे यांची बिनविरोध निवड झाली. सभापतिपद नागरिकांचा मागासप्रवर्ग पुरुष पदासाठी राखीव होते.

अकोल्यात बोबले
सभापतिपदी अंजना बोबले यांची पुनश्च, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे विठ्ठल भांगरे यांची निवड झाली. बोंबले यांनी शिवसेनेच्या कांचन शरद कोंडार यांचा चार मतांनी पराभव केला. उपसभापतिपदासाठी एकच अर्ज आल्याने भांगरेंची बिनविरोध निवड झाली.

नेवाशात उषा गोर्डे
सभापतिपदी उषा पावलस गोर्डे यांची, तर उपसभापतिपदी दिलीप शंकर लोखंडे यांची बिनविरोध निवड झाली. सभापतिपदासाठी भेंडा गणातील गोर्डे यांचा एकमेव अर्ज आला होता. उपसभापतिपदासाठी तीन अर्ज आले होते. दिलीप लोखंडे, जया घुले, जानकीराम डौले यांनी अर्ज दाखल केले होते. डौले व घुले यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे दोन्ही पदे बिनविरोध निवडली गेली.

पाथर्डीत उषा अकोलकर
माजी आमदार राजीव राजळे यांचा शब्द मोडून ऐनवेळी उषा अकोलकर यांनी राजळेंच्या हातावर तुरी देत राष्ट्रवादीच्या गोटात जाऊन दुसऱ्यांदा सभापतिपदाची संधी मिळवली, तर सभापतिपदी ढाकणे गटाच्या बेबी केळकेंद्रे यांची निवड झाली.

कर्जत सभापतिपदी उदमले
सभापतिपदी संगीता मारुती उदमले यांची, तर उपसभापतिपदी कांताबाई बापूसाहेब नेटके यांची निवड झाली. सभापतिपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असल्याने एकमेव सदस्य संगीता उदमले यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदासाठी कांताबाई नेटके व सोनाली बाेराटे यांच्यात लढत झाली. सदस्य नारायण नेटके व डॉ. पंढरीनाथ गोरे हे गैरहजर राहिल्याने कांताबाई नेटके यांना सहा मते, तर सोनाली बोराटे यांना दोन मते मिळाली. राष्ट्रवादीचे दोघे गैरहजर राहिले.

शेवगावमध्ये राष्ट्रवादी
सभापतिपदी राष्ट्रवादीच्या मंगलताई माधव काटे यांची, तर उपसभापती अरुण लांडे यांची बिनविरोध निवड झाली. बैठकीस १० पैकी ९ सदस्य उपस्थित होते.
पारनेरला सभापतिपदी शेळके
सभापतिपदी गणेश शेळके, तर उपसभापतिपदी राणी नीलेश लंके यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापती अरुणा बेलकर यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली. मात्र, निवडीवर त्याचा परिणाम झाला नाही.