आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी सभापतिपदासाठी जाधव यांचा अर्ज दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी शिवसेनेतर्फे सचिन जाधव यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. सभापतिपदाची निवड शुक्रवारी होणार आहे. जाधव यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
जाधव यांनी एकूण तीन अर्ज दाखल केले. या अर्जांवर स्थायी समितीचे सदस्य तथा उपमहापौर श्रीपाद छिंदम, उषा नलावडे, सुनीता फुलसौंदर, दिलीप सातपुते, छाया तिवारी, अनिल बोरूडे यांच्या सूचक अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या अाहेत. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक उमेश कवडे, दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेनेच्या गोटातील अन्य पक्षांचे काही स्थायीचे सदस्य सहलीला गेले आहेत. विरोधकांनी सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास सहलीला गेलेले हे सदस्य गुरूवारी माघारी येतील. सभापतिपदाची निवड बिनविराेध करण्यासाठी शिवसेनेने पूर्ण तयारी केली आहे. परंतु विरोधकांनी अर्ज दाखल केलाच, तर मतदान होईल. निवडणूक झाली, तरी स्थायीचे संख्याबळ पाहता सभापतिपदाची माळ शिवसेनेच्या जाधव यांच्याच गळ्यात पडेल. विरोधकांनी सभापती निवड प्रक्रियेला स्थगिती न्यायालयाकडून स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयाने यासंदर्भात ऑगस्टला सुनावणी ठेवल्याने विरोधकांचा नाइलाज झाला. सभापतिपदाची निवड प्रक्रिया पार पडली, तरी ऑगस्टला होणाऱ्या औरंगाबाद खंडपीठाच्या सुनावणीत सभापतिपदाची निवडच रद्द ठरवण्यात येईल, असा दावा विरोधकांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना केला.

सभापतिपदाची निवड प्रक्रिया प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीच्या सभागृहात पार पडणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया याच वेळी पार पडेल.

बातम्या आणखी आहेत...