आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहर विकासासाठी आता पारदर्शी कामकाज, प्रलंबित योजना तातडीने मार्गी लावण्यात येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदावर शिवसेना पुरस्कृत सचिन जाधव यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. मनपाच्या आतापर्यंतच्या इतिहासात बिनविरोध निवडून येणारे ते पहिलेच सभापती ठरले. सर्वांना बरोबर घेऊन शहर विकासासाठी पारदर्शी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रभारी जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी महापालिकेचे उपायुक्त अजय चारठाणकर, नगर सचिव मिलिंद वैद्य स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते. सभापतिपदी निवड झाल्यानंतर जाधव यांनी लगेच पदभार स्वीकारला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी आमदार अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापाैर भगवान फुलसौंदर, सुवेंद्र गांधी, संभाजी कदम आदींनी जाधव यांचा सत्कार केला.

पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले, सर्वांनी साथ दिल्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे. नगर शहराच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने धोरणात्मक निर्णय घेऊ. शहराचा कायापालट करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे.

फेज टू , खड्डे, रस्ते हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील. महाड येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष करता अगदी साध्या पद्धतीने पदभार स्वीकारला असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.

कामकाजात शंभर टक्के पारदर्शकता राहावी, यासाठी महापालिकेत पत्रकारांसाठी वेगळा कक्ष सुरु करण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या निर्णयात जनतेचे हित किती आहे, हेदेखील तपासणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण
^मुख्यमंत्र्यांची भेटघेऊन देशपांडे रुग्णालयाचा विस्तार रस्त्यांसाठी निधीची मागणी केली. मूलभूत सुविधांमधून चाळीस कोटींचा निधी आला, तरी अद्याप कामे मार्गी लागलेली नाहीत. पावसाळा संपला की, डांबरीकरण सुरू केले जाईल.'' सुरेखा कदम, महापौर.

संपर्क प्रमुखांना धक्काबुक्की?
शिवसेनेत मागील काही दिवसांपासून पदवाटपावरून वाद सुरू आहेत. सभागृह नेतेपदावर ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे गणेश कवडे यांनी दावा केला आहे. शुक्रवारी सभापतींची निवड झाल्यानंतर अनिल राठोड यांच्या संपर्क कार्यालयात संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी बैठक घेतली. बैठकीत सभागृह नेतेपदाच्या नावाची चर्चा सुरू होती. यावेळी गणेश कवडे कोरगावकर यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. कवडे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोरगावकर यांना धक्काबुक्की झाल्याची चर्चादेखील शहरात सुरू होती. परंतु शिवसेना नगरसेवक कार्यकर्त्यांनी मात्र असे काही झालेच नसल्याचे दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...