आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटच्या देवाची होतेय संगमनेरमध्ये अवहेलना, सचिनच्या प्रतिमेची दुरवस्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - क्रिकेटचा देव म्हणून ख्याती पावलेल्या सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी क्रिकेटच्या खेळातील त्याचे महत्त्व तसुभरही कमी झालेले नाही. हजारो उदयोन्मुख खेळाडूंच्या गळ्यातील ताईत असलेल्या या महान क्रिकेटपटूचे मात्र संगमनेर पालिकेच्या प्रशासनाला वावडे असल्याचे दिसून आले. येथील क्रीडा संकुलातील दर्शनी भागातील त्याच्या भल्या मोठ्या प्रतिमेची मात्र सर्रासपणे अवहेलना सुरू आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींत नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

तत्कालीन नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या कार्यकाळात बांधलेल्या या क्रीडा संकुलात लाखो रुपये खर्चून भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची प्रतिमा साकारण्यात आली होती. काही दिवसांतच ही प्रतिमा खराब झाल्याने तत्कालीन नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्या कार्यकाळात त्या ठिकाणी तेंडुलकर यांची फ्लेक्सच्या माध्यमातील प्रतिमा चिकटवली गेली. आता ही प्रतिमाही ठिकठिकाणी फाटली आहे. त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे तालुका क्रीडा अधिकाऱ्यांचे कार्यालयदेखील याच क्रीडा संकुलात आहे. क्रीडा अधिकाऱ्यांनाही पालिका प्रशासन जुमानत नसल्याने त्यांचेही प्रयत्न अपुरे पडल्याचे दिसते.

दोन दिवसांपूर्वी संगमनेरच्या या क्रीडासंकुलात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. राज्यातील अनेक क्रिकेटपटूंनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली. स्थानिक क्रीडाशौकिनांसह नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्यासह संगमनेरातील राजकीय पदाधिकारीही या ठिकाणी आले. मात्र, कोणालाही तेंडुलकरच्या प्रतिमेचा हा दशावतार दिसला नाही. शहर अथवा राज्यात जर एखाद्या फ्लेक्सची अवहेलना झाली, तर त्याच्यावरून गदारोळ उठतो. फ्लेक्स फाटला म्हणून कायदा आणि सुव्यवस्थादेखील धोक्यात येते. मात्र, ज्याचा भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन गौरव झाला, त्या देशाच्या महान खेळाडूच्या टवाळखोरांनी फाडून विद्रूप केलेल्या प्रतिमेकडे लक्ष द्यायला स्थानिक प्रशासनाला वेळ नाही. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण नाशिकला माहिती आयुक्तांकडे असल्याचे सांगून यासंदर्भातील कार्यवाहीबाबत बघावे लागेल, असे सांगितले.