आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माआधीपासूनच अपंगत्वाचा प्रतिबंध करावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारतात अपंगांची संख्या कोटींवर असून विविध मानसिक आजारांनी ग्रस्त व्यक्तीची संख्या कोटींवर गेली आहे. एकीकडे अपंगांचे हक्क, अधिकार आणि पुनर्वसनासाठी काम करत असतानाच दुसरीकडे आधुनिक विज्ञानाच्या मदतीने अपंगत्व निर्माणच होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक काम बालकांच्या जन्मापूर्वीपासून होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका आणि कोल्हापूर येथील हेल्पर्स ऑफ हँडिकॅप्ड संस्थेच्या संस्थापिका नसिमादीदी हुरजूक यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुरजूक यांच्यास्वप्ननगरी या अपंगांच्या पुनर्वसन प्रकल्पाला आर्थिक सहयोग देण्यासाठी "साद माणुसकीची' या कार्यक्रमाचे आयोजन नगरमध्ये करण्यात आले. अनामप्रेम, विद्यार्थी सहायक समिती (श्रीगोंदे), सार्थक सेवा संघ (पुणे), जय मातादी बालगृह (टाकळी खंडेश्वरी, ता. कर्जत) या स्नेहालय परिवारातील संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे अडीच लाखांचा निधी नसिमादीदींना यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शरद कोलते होते.
अनामप्रेम, स्नेहालय या संस्था सरकारी मदतीशिवाय सामाजिक सहयोगातून प्रेरणादायक काम करत आहेत. वस्तुतः या संस्थांना आर्थिक सहयोगाची आवश्यकता आहे. तथापि, अपंगांच्या स्वप्ननगरी प्रकल्पाला आर्थिक सहयोगाची गरज असून संस्थेसाठी मागणारे हात मात्र कमी असल्याने त्यांनी हेल्पर्ससाठी निधी गोळा केला. या संस्थांमधील विश्वस्त भाव आणि इतर संस्थांसाठी काम करण्याची भावना नतमस्तक करणारी आहे, असे नासिमादिदी म्हणाल्या.
यावेळी गायिका सानिका गोरेगावकर हिने कबीर, मीराबाई, तुलसीदास, नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर या संतांचे सामाजिक जाणिवेचे अभंग सादर केले. शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या क्षेत्रात समर्पित कार्य करणारे रमेश फिरोदिया, लॉरेन्स स्वामी, स्वाती आणि गोपीनाथ सरफरे, मच्छिंद्र लंके, नसीरभाई शेख, गौरव गुगळे, सोनल चोरडिया, सईद काझी, सुनील रामदासी, बाबासाहेब गव्हाणे, नीलेश जोशी, दिशा दांडे, स्वतः अंध आणि युवकांसाठी प्रेरणादायक कार्य करणारा नवनाथ रणदिवे, निवृत्त प्राचार्य डॉ. म. ना. बोपर्डीकर, सेलेब्रल पालसी या आजाराने पीडित मुले त्यांच्या पालकांसाठी संस्थात्मक कार्य उभे करणारे डॉ. शंकर शेळके यांचा गौरव यावेळी करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...