आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मानंतर अवघ्या आठव्या दिवशी मातेसमवेत घडलं नगर कॉलेजचं दर्शन - डॉ. सदानंद मोरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचा जन्म झाला नगर येथील आनंदीबाजारात असलेल्या बाळासाहेब देशपांडे सूतिकागृहात.
जन्मानंतर आठव्या दिवशी ते आपल्या आईसह नगर महाविद्यालयात दाखल झाले. तेव्हा हा मुलगा नाव कमवणार हे लक्षात आलं...हे सांगत होते डॉ. मोरे यांचे मामा विक्रमराव काळे.
संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. मोरे यांचा सत्कार ४ जानेवारीला त्यांच्या आजोळी म्हणजे नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यांचे मामा विक्रमराव काळे तिथे राहतात. रेल्वेलाइनजवळच्या ज्या घरात डॉ. मोरे यांचे बालपणचे काही दिवस गेले, ते घर आणि ते एक वर्ष जिथे शिकले ती जिल्हा परिषदेची शाळा अजून तिथे आहे.
सत्काराच्या पार्श्वभूमीवर विक्रमराव (७३ वर्षे) यांच्याशी "दिव्य मराठी'ने संवाद साधला.
डॉ. मोरे यांचे आजोबा गणपतराव कृष्णाजी काळे हे नगरच्या लोकल बोर्डात हेडक्लार्क होते. माळीवाड्यातील ब्राह्मण गल्लीत ते रहायचे. त्यांना ३ मुले आणि ४ मुली. सर्वांत मोठी हिराबाई. नगर महाविद्यालयात हिराबाई बी.ए. करत असताना त्यांचा विवाह झाला. ऐन परीक्षेच्या आधी आठ दिवस सदानंद यांचा जन्म नगरमधील आनंदीबाजारातील बाळासाहेब देशपांडे सूतिकागृहात २७ जून १९५२ रोजी (काही ठिकाणी चुकीने २५ जून असा उल्लेख आहे) झाला.
ओली बाळंत असतानाही आईने परीक्षा देण्याचे ठरवले. कारण नुकत्याच सुरू झालेल्या या महाविद्यालयाची ती पहिलीच बॅच होती. पहिल्या दिवशी गणपतराव काळे आपली मुलगी आणि नवजात नातवाला टांग्यातून नगर महाविद्यालयात घेऊन गेले. परीक्षा सुरू असताना आवारात टांगा कसा आला, याचे महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. भा. पां. हिवाळे यांना आश्चर्य वाटले. वस्तुस्थिती समजल्यावर त्यांना हिराबाईंचे कौतुक वाटले. दुसऱ्या दिवसापासून आपल्या मोटारीतून त्यांनी हिराबाई आणि छोट्या सदानंदला आणण्या-नेण्याची व्यवस्था केली. डॉ. हिवाळेंचा आशीर्वाद लहानग्या सदानंदला मिळाला, तेव्हाच तो मोठेपणी नाव कमवणार हे आमच्या लक्षात आले, असे विक्रमराव म्हणाले.

१९५८ नंतर काळे कुटुंब नगर सोडून सारोळ्यात स्थायिक झाले. पुढे तेथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्यालयात हिराबाईंना शिक्षिकेची नोकरी मिळाली. त्यामुळे १९६२-६३ दरम्यान सदानंद यांचे सहावीचे शिक्षण सारोळ्यात झाले. नंतर ते अनेक वर्षे नगरमधील न्यू आर्टस् महाविद्यालयात प्राध्यापक होते. या काळात आठ-पंधरा दिवसांनी त्यांचे सारोळ्याला येणे व्हायचे. आले की शेतात जायचे. हुरडा, हरभरा, बोरं असा रानमेवा त्यांना आवडायचा. "माझ्यासाठी लापशी करा.'.. असं ते सांगत, अशी आठवण विक्रमरावांनी सांगितली.

आई उपस्थित राहणार
सारोळा कासार येथील सत्कार समारंभासाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या आई हिराबाई (८३ वर्षे) यांच्यासह त्यांच्या तीन बहिणी व मेहुणे येणार आहेत. आई व भावाप्रमाणेच तिघी बहिणीही पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. हिराबाईंनी दोन वर्षांपूर्वी येथील शाळेस एक लाखाची देणगी दिली होती, असे विक्रमराव व अरूण कडूस यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने सत्कार व भोजन झाल्यानंतर डॉ. सदानंद मोरे नगर येथील कार्यक्रमाला येतील.

खासदारकीची ऑफर...
साहित्यिक व संशोधक असलेल्या डॉ. सदानंद मोरे यांची विद्वत्ता आणि अभ्यास पाहून इंदिरा गांधी त्यांना चर्चेसाठी बोलवत असत. लोकसभेच्या निवडणुकीत इंदिराजींनी खेड मतदारसंघातून डॉ. मोरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह केला होता. तथापि, मला तिकीट नको, माझा मार्ग वेगळा आहे, असे नम्रपणे सांगून डॉ. मोरे यांनी त्यास नकार दिला, अशी आठवण त्यांच्या मामांनी सांगितली.