आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत 15 वर्षांनंतर देवळालीची पुनरावृत्ती?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासह आमदार बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांनीही बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. घोलप यांची उमेदवारी कायम राहिल्यास मतविभागणीचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने 1999 मध्ये देवळाली विधानसभा मतदारसंघातील एबी फॉर्म नाट्याची पुनरावृत्तीची शक्यता आहे.

शिवसेनेचे उपनेते व देवळाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव घोलप यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली न्यायालयाने तीन वर्षे सर्शम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्याऐवजी माजी आमदार सदाशिव लोखंडे यांना देताना मंगळवारी एबी फॉर्म देण्यात आला. तर सर्वप्रथम आमदार घोलप यांची उमेदवारी जाहीर केली. त्याच वेळी त्यांनादेखील एबी फॉर्म दिला होता. बुधवारी योगेश घोलप व सदाशिव लोखंडे या दोघांच्या अर्जासोबत एबी फॉर्म जोडण्यात आल्याने शिवसेनेपुढे राजकीय पेच निर्माण झाला आहे. पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी लोखंडे अधिकृत असल्याचे जाहीर केले. दोन्ही उमेदवारांकडे एबी फॉर्म असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. सर्वात प्रथम उमेदवारीचा नियम ग्राह्य धरल्यास शिर्डीतसुद्धा देवळालीतील 15 वर्षांपूर्वीच्या नाट्याची पुनरावृत्ती होणार आहे.

वाकचौरेंनी शिवसेनेला फसवले : लोखंडे
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला फसवले आहे. त्यांच्याविरोधात जनतेमध्ये तीव्र भावना आहेत. कर्जत-जामखेडमधून तीन वेळा आमदार झाल्याने आपण जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती जवळून पाहिली आहे, असे मत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी लोखंडे यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर येथील शिवालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एबी फॉर्म गहाळ
भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सन 1999 च्या निवडणुकीतही शिवसेनेने आमदार घोलप यांना नाकारून त्यांचे पुतणे रविकिरण घोलप यांना उमेदवारी दिली होती. त्या वेळी रविकिरण यांच्यासह आमदार घोलप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु अधिकृत उमेदवार रविकिरण यांचा नाट्यमयरीत्या एबी फॉर्म गहाळ झाल्याने शिवसेनेची नाचक्की झाली. अखेर बबनराव घोलप शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार झाले.