आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadashiv Lokhande News In Marathi, Shiv Sena, Shirdi Lok Sabha Election, Divya Marathi

कृषिमंत्री राधाकृष्ण विखेंवर दावा ठोकणार, सदाशिव लोखंडे झाले आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - मतदारसंघात स्वत:चे अस्तित्व धोक्यात आलेल्या कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अपप्रचार करून बदनामी केल्याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन त्यांच्या विरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत, असे शिर्डीतील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी बुधवारी दै.‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. त्यामुळे ही निवडणूक कायदेशीर लढाईत अडकण्याची शक्यता आहे.
प्रचारासाठी अकोले तालुक्यातील कळस येथे जात असताना लोखंडे बसस्थानकाबाहेर संगमनेरच्या प्रसिद्ध आठवण पोह्यांचा आस्वाद घेण्यासाठी थांबले. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे व स्वाभिमान मंडळाचे शरद थोरात, वृत्तपत्र विक्रेते सतीश आहेर होते. यावेळी त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीशी त्यांनी संवाद साधला.
मंगळवारी कृषिमंत्री विखे यांनी नेवासे येथे बोलताना लोखंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. यासंदर्भात लोखंडे यांना छेडले असता ते म्हणाले, मी लोकसभेची निवडणूक सकारात्मकपणे घेत आहे. पण राजकीय आरोप-प्रत्यारोप करताना जर चुकीच्या पद्धतीने मंत्री विखे माझी बदनामी करत अंगावर येणार असतील, तर मला त्यांना उत्तर द्यावेच लागेल. आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माझे व्यवसाय मी नमूद केले आहेत. त्यात जर काही लपवले असेल, तर विखेंनी जरूर मतदारांना सांगावे. एकेकाळी विखेंची जिल्ह्यात राजकीय कमांड होती. शिर्डीत त्यांनी वाकचैारेंच्या रूपाने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर उमेदवार घेतला आहे. मला मतदारसंघात पाठिंबा मिळत असताना त्यांनी दिलेला उमेदवार निवडून आला नाही, तर विधानसभेची त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. पक्षात त्यांची सर्वत्र छिथू होईल. त्यामुळे माझ्याविरोधात जेवढे खोटेनाटे आरोप करता येतील तेवढे ते करतील. कर्जत-जामखेडमध्ये 1995 ला आमदार झाल्यानंतर आपण कामे केली नसतानाही 99 मध्ये काँग्रेसचा उमेदवार मताधिक्याने पाडल्याचे लोखंडे यांनी नमूद केले.
मी माझ्या कुटुंबासह शिर्डीत येऊन राहीन व तेथेच मतदारांना भेटेल. त्यासाठी त्यांनी मुंबईला जाण्याची गरज नाही. हे मतदारांना माझे वचन असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
काय म्हणाले होते मंत्री विखे
कर्जत-जामखेड व्हाया चेंबूर येथून अनेक पक्ष बदलत आलेला उमेदवार माझ्याकडे काँग्रेसची उमेदवारी मागायला आला होता. लोखंडे यांना शोधण्यासाठी चेंबूरला बियरबारमध्ये जावे लागेल. तुमचा गंभीर पाणीप्रश्न सोडवण्यासाठी चेंबूरला जाऊन पाण्यापेक्षा दारूच घ्यावी लागेल.
विखेंशी कधी जमलेच नाही
कर्जत-जामखेडचा आमदार असताना विखे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांचे व माझे कधी जमलेच नाही. कर्जत-जामखेडमध्ये काम करायचे ते मी ठरवणार, माझा हाजी हाजी करण्याचा स्वभाव नाही, असे केबिनमध्ये मी त्यांना सुनावले होते. मला अद्याप म्हातारचळ लागलेला नाही. तो त्यांच्या कुटुंबाला लागला हे जर मी बोललो, तर बरेच काही बाहेर निघेल. मात्र, एवढय़ा खालच्या पातळीवर आपण जाणार नाही, असे लोखंडे यांनी सांगितले.