शिर्डी - साईबाबांना परमेश्वर मानणे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव आहेत. त्यात साईबाबांचा समावेश केला, तर त्यात गैर काहीच नाही. कणाकणात परमेश्वर असतो, असे मानणारी आमची संस्कृती आहे. साईबाबा तर त्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्यातही परमेश्वर असणारच; पण हे पाहणा-यावर अवलंबून असल्यामुळे कदाचित शंकराचार्यांना ते दिसत नसतील, असे मत प्रयाग येथील परी आखाड्याच्या प्रमुख साध्वी जगद्गुरू शंकराचार्य त्रिकाल भवन्ता यांनी शुक्रवारी शिर्डीत व्यक्त केले.
निवडक शिष्यांसह त्यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, साईबाबांचे वास्तव्य व समाधी असलेल्या शिर्डीत
आपल्याला अदृश्य शक्तींचे अस्तित्व जाणवते. देश-विदेशातील अनेक भाविक साईबाबांना गुरू मानतात.
गुरूचे स्थान परमेश्वरापेक्षाही मोठे असते. त्यामुळे बाबांना परमेश्वर मानण्यात काहीच गैर नाही. शंकराचार्यांनी बाबांच्या देवत्वावर आक्षेप घेणे किंवा त्यांच्या मूर्ती हटविण्याच्या सूचना देणे गैर आहे. हा आस्थेचा विषय असून आपण या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
* साईंचा समावेश देवांमध्ये करावा
हे तर धर्मगुरूंचे अपयश
महिला घरापासून ते राजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रात स्वच्छता करतात. महिला संत धर्माचीही साफसफाई करतील. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. महिलांवर होणारे अत्याचार हे धर्मगुरूंचे अपयश आहे. प्रत्येक महिलेकडे माता-भगिनीच्या दृष्टीने बघितल्यास अशा घटना घडणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
स्त्रीशक्तीला कुंभमेळ्यात स्थान का नाही?
‘हिंदू संस्कृतीत आदिम काळापासून महिलांना उच्च स्थान दिले असून या शक्तीपासूनच धर्माची सुरुवात होते. शिवासोबत पार्वतीलाही तितकेच महत्त्व आहे. विश्वात सर्वत्र महिलांना समान न्याय दिला जात असताना तन-मनाने समाजोत्थानासाठी झटणा-या साध्वींच्या आखाड्याला कुंभमेळ्यात जागा का नाही?’ असा उद्विग्न सवाल त्रिकाल भवन्ता शंकराचार्य यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना नाशकात केला. महिला संतांच्या हक्कासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.