आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाच्या युगातही वाढतोय साहित्याचा प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरीही साहित्य साहित्यिकांचाही प्रभावही कमी होता वाढतोच आहे. अनेक संकटे आली, तरीही वाचन संस्कृती प्रभावीपणे तग धरुन उभी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.

शतक महोत्सव साजरा करत असलेल्या हिंद सेवा मंडळाच्या शिक्षण संस्थेतील साहित्यिकांचे अनोखे साहित्य संमेलन रविवारी पेमराज सारडा कॉलेजच्या प्रांगणात उत्साहात पार पडले. यावेळी शिंदे बोलत होते. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाच्या उद््घाटन समारंभास खासदार दिलीप गांधी, मंडळाचे सचिव सुनील रामदासी, कार्याध्यक्ष शिरीष मोडक, महाविद्यालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनंत फडणीस, प्रकाश पोखरणा, रोहिणी शिवलकर, संजय जोशी, संपत बोरा, अजित बोरा, अनिल देशपांडे, अशोक उपाध्ये, आदिक जोशी, प्रा. जवाहर मुथा, साहित्यिक लहू कानडे, कवी चंद्रकांत पालवे यांच्यासह जिल्ह्यातून आलेले साहित्यिक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी खासदार गांधी यांच्या हस्ते मंत्रोच्चारात ग्रंथपूजन होऊन पेमराज सारडा महाविद्यालय परिसरात वाजतगाजत ग्रंथदिंडी काढण्यात आली. सजवलेल्या पालखीमध्ये भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते. संतांच्या जयघोषात ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आल्यावर खासदार गांधी यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात मंडळाच्या साहित्यिकांचे प्रकाशित झालेले साहित्य, तसेच महाराष्ट्रातील नावाजलेल्या साहित्यिकांची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आले.

रामदासी यांनी हिंद सेवा मंडळाचा इतिहास सांगितला. अ‍ॅड. अनंत फडणीस यांनी पेमराज सारडा महाविद्यालयाने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन यंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मोडक यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अमरजा रेखी यांनी केले, तर आभार डॉ. विद्या सहस्त्रबुद्धे यांनी मानले. प्रथम सत्राचे सूत्रसंचालन डॉ. संगीता शेळके, भावना वैकर जया जेठे यांनी केले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी डॉ. राजेंद्र मारवाडे, राजू रिक्कल, माहेश्वरी गावित प्रयत्नशील होते. या संमेलनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

साहित्याचा प्रसार व्हावा...
एखाद्याशैक्षणिक संस्थेने साहित्यिकांचा मेळावा आयोजित करणे ही गौरवास्पद बाब आहे. राज्यात असे पहिलेच संमेलन होत असावे. सोशल मीडियाच्या आधुनिक युगातही पुस्तकांचे महत्त्व कमी झालेले नाही. दिवसेंदिवस नवीन साहित्य उपलब्ध होत आहे. शतक महोत्सव साजरे होत असलेले हिंद सेवा मंडळात आजवर अनेक साहित्यिक घडले आहेत. त्यामुळे आगामी काळात या साहित्याचा प्रसार होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी यावेळी बोलताना केले.