आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्जेदार साहित्यासाठी संमेलनांची आवश्यकता - अभिनेते मिलिंद शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दर्जेदार साहित्याच्या निर्मितीसाठी सर्वत्र साहित्य संमेलने होणे गरजेचे आहे. लिहायचे असेल तर वाचावे लागते. लेखक जे लिहितो ते मी करून बघतो. ते करून बघणे हा माझ्या अभिनयाचा रियाज असतो, असे प्रतिपादन अभिनेते मिलिंद शिंदे यांनी केले.

हिंद सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साहित्यिकांच्या संमेलनाच्या समारोपप्रसंगी शिंदे बोलत होते. महाविद्यालयाचे माजी िवद्यार्थी प्राचार्य डॉ. जयंत कुलकर्णी, साहित्यिक संजय कळमकर, वसुधा गंधे-देशपांडे, वसू भारद्वाज, चंद्रकांत पालवे आदी यावेळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मुळे होते. कार्याध्यक्ष शिरीष मोडक, सचिव सुनील रामदासी, अनंत फडणीस, रोहिणी शिवलकर, अजित बोरा, प्राचार्य डॉ. अमरजा रेखी, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, उपप्राचार्य सुजाता काळे, प्रबंधक अशोक असेरी आदी यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, मी लिहितो, पण दुसर्‍याचे वाचत नाही, हा नवा प्रवाह सध्या आला आहे. अन्य साहित्यिकांचे साहित्य वाचून आपल्याशी तुलना करणे हे प्रकार घडत आहेत. चांगल्या गोष्टी येण्यासाठी आपलाच वाद आपल्याशी व्हायला हवा.

सारडा महाविद्यालयामुळेच आम्ही सर्व साहित्यिक अभिनेते घडलो आहोत. आमच्या यशात हिंद सेवा मंडळाचा सिंहाचा वाटा आहे. प्राचार्य कुलकर्णी म्हणाले, साहित्य हा सशक्त समाजाचा घटक आहे. रसरशीत अनुभवातून आलेल्या साहित्याला अमरत्व लाभते. शब्द हे आपल्या जगण्याचे माध्यम आहे. क्षर आणि अक्षर हे दोन शब्द आहेत. परंतु "अ' हा अनुभूतीचा आहे. शब्दांना अनुभूतीची जोड हवी. समाजात शिक्षण, उद्योग अर्थकारणाबरोबरच साहित्य संस्कृती महत्त्वाची आहे. माणसाचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात अनेक घटक कारणीभूत असतात, त्यात साहित्याचाही समावेश आहे. हिंद सेवा मंडळाने आयोजित केलेले हे अनोखे साहित्य संमेलन हा अत्यंत चांगला उपक्रम आहे.

संजय कळमकर म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालयात शिक्षण घेताना शिक्षकांनी दिलेल्या साहित्याचे सेंद्रीय गुण घेऊनच मी सध्या राज्यभर फिरतो आहे. विनोद तिरकसपणाची बीजे माझ्यात येथेच रुजली. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच अनेक साहित्यिक तयार झाले.

संमेलनात सहभागी झालेल्या सर्व साहित्यिकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळाला. उदय एजन्सीचे वाल्मिक कुलकर्णी यांचे सहकार्य या प्रदर्शनासाठी मिळाले. रात्री उशिरापर्यंत ग्रंथप्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

कवि संमेलन कथाकथन
दुपारच्या सत्रात कविसंमेलन कथाकथन पार पडले. ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात हेरंब कुलकर्णी, शशिकांत शिंदे, अनिल गुंजाळ, आशिष निनगुणकर, क्रांतिकला अनभुले, धनंजय धोपावकर, वृषाली एकबोटे, डॉ. लीला गोविलकर, एम. पी. दिवाण, ऋता ठाकूर, विजया निसळ, सुधीर पाठक, नरेंद्र काळे, अण्णा संत यांनी कविता सादर केल्या. कथाकथनाचे प्रास्ताविक प्रा. स्मिता भुसे यांनी केले. शामली जोशी, डी. यू. जोशी, वसुधा गंधे, वसू भारद्वाज, संजय कळमकर यांनी कथा सांगितल्या.