आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यिकांनी प्रतिभेचा वापर खर्‍यासाठी करावा - फ. मुं. शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - साहित्यिकांकडे शब्दांचे लाघव व वेगळी शैली असते. पण, या प्रतिभेच्या आधारे त्यांनी लबाडी लपवून लेखन करता कामा नये. आपल्यापेक्षा काहीही न लिहिणारी माणसेच अधिक खरी असतात, ही जाणीव साहित्यिकांनी ठेवावी आणि आपल्या प्रतिभेचा वापर खरं बोलण्यासाठी करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विनोदी कवी, तसेच सासवड येथे होणार्‍या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी शुक्रवारी (15 नोव्हेंबर) केले.
भाऊसाहेब फिरोदिया माजी विद्यार्थी संघ, अहमदनगर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ व महाराष्ट्र साहित्य परिषदेची नगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिंदे यांचा, तर नेत्रदान चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल ‘असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन ऑफ इंडिया’चा पुरस्कार मिळालेले यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांचा सहकार सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख अध्यक्षस्थानी होते. वातट्रिकाकार रामदास फुटाणे, आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, लीलाताई शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फ. मुं. नी आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मी एकटा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष नाही. हा मान समाजातील प्रत्येकाचा आहे. माझी आई, पत्नीच्या रूपातील आई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात दिसणारी सामाजिक आई अशा सर्व जन्मदात्यांना हा सन्मान मी अर्पण केलेला आहे. लोक मला विनोदी कवी म्हणतात. पण, गांभीर्याची गंगोत्री ही गमतीतूनच निघते. कारण, ज्याला आपण विनोद म्हणतो, खरे तर त्यासारखे दुसरे गांभीर्य कोणतेच नसते, असे मला वाटते, असे फ. मुं. यांनी सांगितले.
यशवंतराव गडाख म्हणाले, फ. मुं. च्या कवितेत उपहास असला, तरी त्याने कोणाला जखम होणार नाही, याची काळजी ते घेतात. ग्रामीण महाराष्ट्रात त्यांनी अनेक साहित्यिक घडवले. म्हणूनच ते निर्विवाद अध्यक्ष झाले आहेत. पोपटराव पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक योगेश अनासपुरे यांनी केले. सूत्रसंचालन संजीव तनपुरे यांनी केले. जिल्हा बँकेतर्फेही फ. मुं. चा गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी नेत्रदान चळवळीविषयी माहिती दिली.
सरकारमुळे ‘जाती’ जिवंत
वातट्रिकाकार फुटाणे म्हणाले, गरज नसताना सरकारने प्रत्येक जातीचे महामंडळ काढून जाती ‘जिवंत’ ठेवल्या. त्यामुळे माणसातील रक्ताचे रंग वेगळे झाले. मात्र, आता आपल्यात लाल रक्त आहे, हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे 20 टक्के लोक ‘इंडिया’त अन् 80 टक्के लोक ‘भारता’त राहतात. त्यामुळे प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. हे बदलण्यासाठी जातीद्वेष व धर्मद्वेष कमी होऊन सगळा समाज एकसंध व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘पवार’ जातीलच कसे?
फ. मुं. म्हणाले, पत्रकार साहित्यिकांना राजकीय प्रश्न विचारतात. अध्यक्ष झाल्यापासून मलाही विचारणा होत आहे, तुमच्या संमेलनाला सत्ताधारी येणार का? मी सांगतो, सत्ताधारी यावेत हीच माझी इच्छा आहे. एकाने मला विचारले, अंतुले ‘सिमेंट’मुळे गेले, निलंगेकर ‘मार्कां’मुळे गेले, मग (शरद) पवार कसे जाणार? कोंडीत पकडणारा हा प्रश्न ऐकून मीही प्रतिप्रश्न केला की, ‘पण, पवार जातीलच कसे?’ यावर चांगलाच हशा पिकला.
फ. मुं. चं ‘दृष्टिदान’
यशवंतराव गडाख व फ. मुं. नी आपल्या खास शैलीने सभागृहात हशा पिकवला. गडाख म्हणाले, फ. मुं. मराठवाड्याचे आहेत. तुम्ही आमचे पाणी पळवता, तरी आम्ही तुमचा सत्कार करतो. कारण आमचे मन मोठे आहे. त्यावर चांगलाच हशा पिकला. कार्यक्रमात नेत्रदानाचा अर्ज भरलेले फ. मुं. म्हणाले, नेत्रदान व दृष्टिदानाचे संदर्भ वेगळे आहेत. माझे नेत्र मिळणारा माणूस जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहील, हे कोडेच आहे. यावरही सभागृहात चांगलीच खसखस पिकली.
‘प्रशांत’चे मन सागरासारखे
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख व आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे फ. मुं. नी कौतुक केले. नावातच ‘महासागर’ असलेला ‘प्रशांत’ ग्रामीण भागात नेत्रदानाची चळवळ नेटाने रुजवत आहे. हे सोपे काम नसले तरी प्रशांतची धडपड कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. तर पोपटराव हे ‘डोळ्यातलं पाणी तळ्यात आणणारी जलदेवता’ आहे, अशा शब्दांत त्यांनी पवार यांचा गौरव केला.