शिर्डी - कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा संस्थानच्या उत्पन्नात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. संस्थानच्या दानपेटीत गेल्यावर्षी ४०९.९५ कोटी रुपये जमा झाले होते. यावर्षी ५३०.८० कोटी रुपयांचे दान साईचरणी अर्पण करण्यात आले आहे. दरम्यान, संस्थानने विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात एक हजार ९८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
पाच वर्षांपूर्वी ३१ मार्च २०१० अखेर संस्थानचे वार्षिक उत्पन्न २१४ कोटी, तर खर्च १२७ कोटी होता. त्या वेळी ४२७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. पाच वर्षांनंतर ३१ मार्च २०१४ अखेर साई संस्थानचे उत्पन्न जवळपास दुपटीने वाढून वार्षिक ५३० कोटींच्या वर गेले आहे. तसा खर्चही ३२२ कोटींपर्यंत पोहोचला आहे.
विशेष म्हणजे, वाढत्या दानधर्मामुळे संस्थानची गुंतवणूकही १०९८ कोटींच्या वर पोहोचली आहे.
१.६७ लाख आजीव सभासद
साईबाबा संस्थानचे आश्रयदाते सभासद ३३ हजारांवर असून, आजीव सभासदांची संख्या १ लाख ६७ हजारांच्या जवळपास आहे. भक्त मंडळाची एकूण सभासद संख्या आता दोन लाखांच्या पुढे गेली आहे. साई संस्थानने २०१३-१४ या वर्षापासून दर्शनरांगेतील भाविकांना प्रसादाच्या मोफत दोन लाडूचा उपक्रम सुरू केला.
असे उत्पन्न अन् खर्चही
-जनसंपर्क विभागामार्फत ३ लाख १२ हजार भक्तांनी सशुल्क दर्शन घेतले. त्यापासून संस्थानला चार कोटी ९९ लाख इतके उत्पन्न मिळाले.
-ऑनलाइन सुविधेचा लाभ ४ लाख ८२ हजार भक्तांनी घेत संस्थानच्या महसुलात १० कोटी ७९ लाख रुपयांची भर घातली.
-दक्षिणापेटी, गुंतवणुकीवरील व्याज, सर्वसाधारण देणगी, प्रसादालय, दुरुस्ती, अन्नदान, वैद्यकीय निधी, वस्तू स्वरूपातील देणगी, पुस्तके, फोटो दैनंदिनी, दिनदर्शिका, कॅसेट आणि शैक्षणिक निधीद्वारे वार्षिक ५३० कोटी इतके उत्पन्न लाभले.
-प्रसादालय, रुग्णालये, वेतन, दुरुस्ती, देखभाल, वैद्यकीय अनुदान, छपाई खर्च, भांडवली खर्च आणि इतर अनुदाने यासाठी ३२२ कोटी खर्च झाला आहे.
शताब्दी सोहळ्याचे नियोजन आत्ताच व्हावे
साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष २०१७-१८ मध्ये साजरे होणार आहे. या पुण्यतिथी शतक महोत्सवाला ४ वर्षे बाकी असली, तरी त्या सोहळ्यासाठी दाखल होणा-या कोट्यवधी भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी आतापासूनच नियोजन करण्याच आवश्यकता आहे. भाविकांच्या सुविधांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष निधीची गरज भासेल.
त्यासाठी पाठपुरावा सुरू झाला पाहिजे. साईबाबा संस्थानचा वार्षिक ताळेबंद जेव्हा विधी मंडळाच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला जाईल. तेव्हा त्यावर सभागृहात विशेष चर्चा होऊन राज्य शासनाने शताब्दी सोहळ्यासाठी विशेष पुढाकार घेण्याची गरज साईभक्तांकडून मागणी होत आहे.